शारीरिक त्रास होत असतांना सौ. अंजली कणगलेकर यांनी अनुभवलेली भगवंताची कृपा !

सौ. अंजली कणगलेकर

१. पहाटे स्नान करून स्नानगृहातून बाहेर येतांना अकस्मात् डावा पाय लुळा पडणे, अशा स्थितीत भगवंतानेच शक्ती देऊन पलंगावर आणून बसवल्याचे जाणवणे

३१.१.२०२१ या दिवशी मी पहाटे ४ वाजता उठले. स्नान करून बाहेर येण्यासाठी दाराची कडी काढतांना अकस्मात् माझ्या पायांतील शक्ती नाहीशी झाल्याचे मला जाणवले. मला वाटले, ‘डावा पाय गुडघ्यातून खाली पडत आहे.’ त्याच वेळी माझ्या कमरेतून आडव्या रेषेत एक कळ गेली आणि कमरेखालचा भाग लुळा पडत असल्याचे मला जाणवले. लगेच ‘एखाद्या फुग्यात हवा भरावी, तशी उजव्या पायात कुणीतरी शक्ती भरत आहे आणि त्या पायात बळ आले आहे’, असेही मला जाणवले. त्याच क्षणी माझा डावा हात बधीर होत असल्याचेही मला जाणवले. दुसऱ्याच क्षणी डावा हात पूर्ववत् होऊन केवळ डाव्या पायातील शक्ती पूर्ण गेल्याने पाय लुळा आणि बधीर झाल्याचे माझ्या लक्षात आले. मार्गिकेच्या एका बाजूला स्नानगृहाचा दरवाजा आणि दुसऱ्या बाजूला खोलीचा दरवाजा एवढेच अंतर असूनही मला स्नानगृहाचा उंबरठा ओलांडून बाहेर येणे शक्य होत नव्हते. भानावर आल्यावर मी पलंगावर असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘अशा स्थितीतून मी खोलीत कशी आले आणि पलंगावर कशी बसले’, हे अजूनही माझ्यासाठी एक गूढच आहे. भगवंतानेच मला पलंगावर बसवले. त्यानंतरही भगवंतच मला विचार देत होता आणि त्यानुसार माझ्याकडून पुढीलप्रमाणे कृती होत होत्या.

१ अ. शक्ती गेलेल्या डाव्या पायाची स्थिती जाणून घेणे : ‘एका हाताने डावा पाय धरून तो हलवून पहाणे, पायावर हाताने थापट्या मारून पहाणे, स्पर्श जाणवतो का ते पहाणे’ इत्यादी कृती माझ्याकडून झाल्या.

१ आ. मुलाला संपर्क करणे आणि त्याने औषध देणे : ‘पहाटेची वेळ असल्याने साहाय्य घ्यायचे, तर इतरांची झोपमोड होईल. मी देवाला विचारले, ‘कोणाला बोलवू ?’ त्याने सांगितल्यानुसार मी डॉ. अंजेशला (मुलाला) संपर्क करून खाली यायला सांगितले. त्याने मला औषध दिले.

२. डावा पाय हत्तीच्या पायाएवढा मोठा आणि जड वाटणे, तरीही आतून शांतपणे अन् स्थिर राहून नामजप करणे

त्यानंतर वैद्यांनी माझा रक्तदाब पाहिला. माझा रक्तदाब १६० – ८० असा होता. (सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या रक्तदाब १२०-८० एवढा असतो.) माझ्या नाडीचे ठोकेही सामान्य होते. काही वेळाने वैद्यांनी मला एक औषध आणून दिले आणि ते मधातून घेण्यास दिले. हे सर्व होईपर्यंत मला भानच नव्हते. मी भानावर आल्यावर ‘माझा डावा पाय हत्तीच्या पायाएवढा मोठा असून पुष्कळ जड आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘एवढे सगळे होत असतांना मी आतून शांत आणि स्थिर असून माझा नामजप संथ लयीत होत आहे’, याची मला जाणीव झाली.

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेसाठी नामजपादी उपाय केल्यावर तिला पायाला हलकेपणा जाणवणे आणि कृतज्ञतेने तिच्या डोळ्यांतून अश्रू येणे

मी नामजप करत पलंगावर पहुडले होते. अनुमाने २० ते २५ मिनिटांनी पायाचे वजन काही अंशी न्यून होऊन माझ्या पायाला हलकेपणा जाणवू लागला. काही वेळाने वैद्या (कु.) अपर्णा महांगडे आल्या. त्यांनी मला सांगितले, ‘‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तुमच्यासाठी अर्धा घंटा नामजपादी उपाय केले.’’ तेव्हा मला पायाला जाणवणाऱ्या हलकेपणाचे रहस्य उलगडले. माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अश्रू ओघळू लागले.

४. ‘भगवंतच कर्ता-करविता असून त्यानेच सर्व भार उचलला आहे आणि आलेले मोठे संकट केवळ भगवंताच्या कृपेने टळले अन् भगवंत आपत्काळासाठी साधकांच्या मनाची सिद्धता करून घेत आहे’, याची जाणीव होणे

या सर्व प्रसंगांत ‘भगवंतच कर्ता-करविता आहे’, हे मी अनुभवले. माझ्यावर आलेले मोठे संकट केवळ भगवंताच्या कृपेनेच टळले. ‘तोच सर्व भार उचलतो आणि साधकांना लहानसा भाग भोगायला देतो’, हे मी पुन्हा एकदा अनुभवले. दुसऱ्या दिवसापासून माझ्या पायात सुधारणा होऊ लागली आणि ५ दिवसांनंतर माझ्या पायाला संवेदना जाणवू लागल्या. आता माझ्या पायाला हलकेपणा जाणवत आहे.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘साधकांसाठी आपत्काळ हा संपत्काळ ठरत आहे’, असे वाटते. ‘भगवंत साधकांच्या मनाची सिद्धता करवून घेत आहे. साधकांना पुढच्या प्रसंगांना तोंड देण्याचे बळ देत आहे. त्यांना अनेक गोष्टी शिकवत आहे’, हेच मला यातून अनुभवता आले.

‘देवा, आम्हा पामरांवर तुझी अखंड कृपा राहू दे आणि तुला अपेक्षित असे घडता येऊन शेवटच्या श्वासापर्यंत तुझी सेवा करता येऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !

– सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी.(२.३.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक