‘कन्यादान’ विधीविषयी बेताल वक्तव्य केल्याचे प्रकरण
नंदुरबार – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिसंवाद मेळाव्यात भाषण करतांना मारुतिस्तोत्राची चेष्टा केली, तसेच ‘कन्यादान’ विधीविषयी जाणूनबुजून बेताल अन् खोटे वक्तव्य केले. हिंदु धर्म परंपरेची खिल्ली उडवल्याप्रकरणी ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’चे नरेंद्र परशराम पाटील यांनी त्यांच्यावर भादंवि कलम १५३(अ), २९५(अ) अंतर्गत गुन्हा नोंद होण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात २४ एप्रिल या दिवशी तक्रार प्रविष्ट केली. तक्रारीत म्हटले आहे की,…
१. हिंदु धर्मात विवाह संस्कारातील कन्यादान विधी म्हणजे अत्यंत पवित्र कार्य असून त्या विधीद्वारे दोन कुटुंब आणि वधू-वर यांच्यात पवित्र संबंध निर्माण होतात. कन्यादानानंतर मुलीला संसारात सौभाग्य प्राप्त होते. कन्यादान विधीमध्ये ‘मम भार्या समर्पयामि ।’ असा कुठलाही मंत्र नाही अथवा विवाहात असा मंत्रोच्चार केला जात नाही.
२. हिंदु धर्म आणि संस्कृती यांमधील कोणत्याही धार्मिक विधीविषयी शास्त्रोक्त माहिती नसतांना अमोल मिटकरी यांनी जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने हे वक्तव्य केले आहे. मारुतिस्तोत्राची चेष्टा करून रामभक्त हनुमानाविषयी असलेल्या श्रद्धेचाही अपमान केलेला आहे.