उत्तरप्रदेशात १७ सहस्र धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून झाला !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक ठिकाणी भोंगे काढण्यात आले आहेत किंवा त्यांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत उत्तरप्रदेशातील १२५ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत, तर १७ सहस्र धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. याखेरीज सरकारने मोठा आवाज असणाऱ्या भोंग्यांविषयीचा अहवालही मागवला आहे. हा अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करावा लाणार आहे.

उत्तरप्रदेशातील संवेदनशील जिल्ह्यांत ‘अलविदा नमाजा’च्या (रमझान मासातील शेवटच्या शुक्रवारचे नमाजपठण) सूत्रावर पोलिसांनी सूचना दिली आहे. या नमाजाच्या वेळी आणि त्यापूर्वी होणाऱ्या सर्वच धार्मिक समारंभात भोंग्यांचा आवाज अल्प ठेवण्याच्या सूत्रावर जवळपास ३७ सहस्र ३४४ धर्मगुरूंशी चर्चा केली आहे. तसेच आता नवे समारंभ आणि नव्या धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्याची अनुमती देण्यात येणार नाही.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात असे होऊ शकते, तर संपूर्ण देशात का होऊ शकत नाही ?