क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

हिंदु जनजागृती समितीकडून शिक्षणमंत्र्यांना कारवाई करण्यासाठी निवेदन !

उजवीकडे  बी.सी. नागेश यांच्याशी चर्चा करतांना  श्री. मोहन गौडा आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली. समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात बी.सी. नागेश यांना निवेदन देण्यात आले. नागेश यांनी याविषयी चौकशीचे आदेश दिले. अहवाल आल्यावर लगेच याविषयी कार्यावाही करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.’’

श्री. गौडा पुढे म्हणाले की, राष्ट्रीय बाल आयोगाने बेंगळुरूच्या जिल्हाधिकाऱ्यांना क्लॅरेन्सप्रकरणी कायदेशीर कार्यवाही करायचे आदेश दिले आहेत. हिंदु जनजागृती समिती जिल्हाधिकारी, तसेच शिक्षणमंत्री यांच्याकडून कार्यवाहीची वाट पहात आहे. त्यानंतर आम्ही कायदेशीर लढा देणार आहोत. आमची मागणी आहे की, केवळ क्लॅरेन्स हायस्कूलच नव्हे, तर राज्यभरातील सर्वच कॉन्व्हेंट शाळांमध्ये धर्मांतर अथवा विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे चालू आहे का, अशा सर्वच गोष्टींविषयी चौकशी करण्यात यावी. ‘संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे’, अशी मागणीही गौडा यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली.