गोव्याच्या राज्यपालांच्या नावाने भामट्यांकडून अनेक पत्रकारांकडे पैशांची मागणी

गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषणाला प्रारंभ

गोव्याचे राज्यपाल पी.एस्.श्रीधरन् पिल्लई

पणजी, २३ एप्रिल (वार्ता.) – गोव्याचे राज्यपाल पी.एस्.श्रीधरन् पिल्लई यांच्या नावाने २२ एप्रिल या दिवशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून राज्यात अनेक पत्रकारांकडे पैशांची मागणी करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाने या घटनेच्या अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.

२२ एप्रिल या दिवशी अनेक पत्रकारांना त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर राज्यपाल पी.एस्.श्रीधरन् पिल्लई यांच्या नावाने संदेश आला आणि तातडीने ‘अ‍ॅमेझॉन’ किंवा ‘गुगल पे’च्या माध्यमातून पैसे भरण्याची मागणी करण्यात आली. ७४०९१०५४३० या क्रमांकावरून हा संदेश आला. या संदेशात म्हटले आहे, ‘मी (राज्यपाल) एका महत्त्वाच्या बैठकीत आहे आणि पुढील एक घंटा मी व्यस्त असणार आहे. मला काही महत्त्वाची कामे करायची आहेत; परंतु ती करायला मला वेळ नाही. यासाठी जमेल तेवढ्या लवकर ‘गिफ्ट कार्ड’ खरेदी करावे. मला हे ‘गिफ्ट कार्ड’ पुढील एक घंट्याच्या आत पुढे पाठवायचे आहे. यासाठी कोणत्या प्रकारचे ‘गिफ्ट कार्ड’ पाहिजे आणि त्यासाठी किती पैसे लागणार याची तुम्हाला मी माहिती देतो. मी तुम्हाला तुमचे पैसे दिवस संपण्यापूर्वी परत करीन.’  याला जोडूनच आलेल्या दुसर्‍या बनावट संदेशात म्हटले होते, ‘प्रत्येकी १० सहस्र रुपये किमतीचे ‘अ‍ॅमेझॉन पे ई गिफ्ट कार्ड’ पाहिजे. या ‘गिफ्ट कार्ड’साठी ‘धन्यवाद’ हा ‘थीम’ वापरावा. हे ‘गिफ्ट कार्ड’ खरेदी केल्यावर त्याचा ‘लिंक’ मला ‘शेअर’ करावा आणि त्याची मला सूचना द्यावी.’

राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गंभीर घटनेचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून अन्वेषण चालू झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या मते गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी तांत्रिक गोष्टी पडताळल्या जात आहेत.