मी कोरोना काळात रुग्णालयात भरती झालो असतांना जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. जे रुग्ण चालू शकत होते, ते त्यांना लावलेला ‘ऑक्सिजन’चा पुरवठा बंद न करताच शौचालयात किंवा पाणी भरायला जायचे. अशा वेळी ‘ऑक्सिजन’चा तुटवडा आहे आणि आपण तो वाया घालवत आहोत’, असा विचारही त्यांच्या मनात येत नव्हता.
२. एका रुग्णाची प्रकृती ठीक झाल्यावर आधुनिक वैद्य त्याला ‘डिस्चार्ज’ द्यायला (रुग्णालयातून घरी पाठवायला) सिद्ध होते; पण तो म्हणाला, ‘‘मला आणखी ३ दिवस इथेच ठेवा, तरच मला सरकारकडून पैसे मिळतील; नाहीतर मला १० ते १५ सहस्र रुपये भरावे लागतील.’’ (‘एखादी व्यक्ती रुग्णालयात ७ दिवस कोविड उपचारांसाठी राहिली, तर सरकार त्याचे देयक भरते’, अशी एक योजना होती.) अशा प्रकारे त्या रुग्णाने अतीमहत्त्वाचा १ ‘ऑक्सिजन बेड’ आवश्यक नसतांना अडवून ठेवला.
३. एका रुग्णाला त्याची बायको जेवण आणून द्यायची. तेव्हा ते दोघेही एकाच ताटातून जेवत असत. त्यामुळे सामाजिक अंतर (‘सोशल डिस्टन्स’) पाळले जात नव्हते.’
– श्री. प्रताप कापडिया (६४ टक्के आध्यात्मिक पातळी), फोंडा, गोवा. (८.५.२०२१)