एस्.एस्,आर्.एफ.च्या विदेशात रहाणाऱ्या साधकांना साधना करतांना येणाऱ्या अडचणी

वाचा नवीन सदर : विदेशात प्रतिकूल स्थितीतही तळमळीने साधना करणारे एस्.एस्,आर्.एफ.चे साधक

विदेशातील साधकांना साधना करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे अशा स्थितीतही तेथील साधक चिकाटीने अन् तळमळीने साधना करत आहेत. ‘त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते ?’, हे पुढे दिले आहे. यातून ‘भारतात साधना करण्यासाठी किती अनुकूल वातावरण आहे !’, हे लक्षात येते.

१. वातावरणात वाईट शक्तींचे अस्तित्व जाणवणे, कुठेही गेल्यावर विविध प्रकारचे त्रास होणे आणि ते न्यून होण्यासाठी नामजपादी उपाय करावे लागणे

‘मी युरोपातील अनेक देशांत फिरलो आणि राहिलो आहे. मला तेथील वातावरणात वाईट शक्तींचे अस्तित्व जाणवते. धान्य आणि कपडे यांच्या दुकानांत गेल्यावर, सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असतांना, बागेत जाऊन आल्यावर किंवा शहरात नुसते फिरून आल्यावर मला त्रासदायक वाटते. माझे मन आणि बुद्धी यांच्याभोवती त्रासदायक शक्तीचे दाट आवरण निर्माण होत असल्याचे मला जाणवते. त्या वेळी मला ‘निरुत्साह जाणवणे, थकवा येणे, डोकेदुखी, उष्णता जाणवणे’ इत्यादी त्रास जाणवतात. माझा त्रास न्यून होण्यासाठी मला नामजपादी उपाय करावे लागतात. मी घरी आल्यावर काही घंट्यांनी माझी स्थिती सर्वसाधारण होते. त्यामुळे मी शक्यतो बाहेर जाणे टाळतो. जिथे चांगली स्पंदने आहेत तेथे आणि साधकांच्या सहवासात रहाण्याचा मी प्रयत्न करतो.

२. सभोवती असणाऱ्या इमारतींच्या भिंतींतून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे आणि त्यामुळे विविध प्रकारचे त्रास होणे

आमच्या इमारतीच्या बाजूला असणाऱ्या इमारतींतून आमच्या इमारतीत त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होत असते. ही त्रासदायक शक्ती भिंतींतून प्रवाहित होते. आमच्या इमारतीतील चांगली शक्ती आणि अन्य इमारतींकडून येणारी त्रासदायक शक्ती यांच्यात सूक्ष्मातून युद्ध चालू असते. त्रासदायक शक्तीमुळे मला ‘निरुत्साही वाटणे, विविध इच्छा वाढणे, तसेच शरिरात अन् शरिराभोवती उष्णता जाणवणे’, असे त्रास होतात. अन्य इमारतींत रहाणारे लोक दुपारपासून सायंकाळपर्यंत घरी असतात. तेव्हा मला अधिक त्रास होतो. यातून ‘रज-तमात्मक जीवनशैलीचा केवळ त्या व्यक्तींवरच नव्हे, तर त्या परिसरातील व्यक्तींवरही कसा विपरीत परिणाम होतो ?’, हे माझ्या लक्षात आले.

३. लोकांची रज-तमात्मक जीवनशैली

अ. येथे सर्वसामान्यपणे ‘आहारात मांस असणे अत्यावश्यक आहे’, असे मानले जाते. त्यामुळे जेवणात मांस असल्याविना येथील लोक आहार घेतच नाहीत. येथे शाकाहारी व्यक्ती, तसेच शाकाहारी भोजनालय सापडणे अतिशय दुर्मिळ आहे. मी कार्यालयातील काही व्यक्तींसह शाकाहार घेत असल्यास त्यांना ‘मी ते पदार्थ खाल्ले, तरी मी काही न खाल्ल्याप्रमाणे असल्याने मला भूक लागेल’, असे वाटते.

आ. बहुतांश लोक प्रतिदिन धूम्रपान आणि मद्यपान करतात.

इ. माझे मित्र किंवा कार्यालयातील सहकारी यांना ‘मी मांसाहार किंवा मद्यपान करत नाही’, असे कळल्यावर त्यांना त्याचे पुष्कळ आश्चर्य वाटते. ते माझी ‘संन्यासी’ म्हणून चेष्टा-मस्करी करतात.

ई. येथील बहुतांश लोक बोलतांना शिव्या-शाप देतात, तसेच अश्लील शब्द वापरतात. हे इतके सर्वसामान्य झाले आहे की, ‘आपण शिव्या-शाप देत आहोत’, हेही त्यांना कळत नाही. ते देवाच्या नावानेही शिवीगाळ करतात आणि ‘असे करणे अत्यंत अयोग्य आहे’, याची त्यांना जाणीवही नसते.

४. उघडपणे साधना करता न येणे

येथील लोकांशी देव किंवा साधना यांविषयी बोलणे शक्य नसते. एखादी व्यक्ती त्याविषयी बोललीच, तर लोक तिला कट्टरपंथीय समजतात. सार्वजनिक ठिकाणी आपण प्रार्थना केली किंवा नमस्काराची मुद्रा केली, तर लोक आपल्याकडे विचित्र दृष्टीने पहातात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात. येथील लोकांना आपण असे काही करतांना दिसलो, तर त्यांना आपली भीती वाटते. त्यामुळे आम्हाला उघडपणे साधना करता येत नाही.’

– एक साधक, युरोप (वर्ष २०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत आणि त्यांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.