गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून अटक

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ट्वीट केल्यावरून कारवाई  

पालनपूर (गुजरात) – गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसामच्या पोलिसांनी २० एप्रिलच्या रात्री येथून अटक केली. त्यांना आसाममध्ये नेण्यात येणार आहे. मेवाणी यांच्याविरोधात आसाममध्ये काही गुन्हे नोंदवण्यात आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. याविषयी काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी ट्वीट करून ‘आसाम पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता मेवाणी यांना अटक केली आहे. तसेच कायदेशीर कारवाईविषयी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रत देखील देण्यात आली नाही’, असा दावा केला आहे.

जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आसामच्या कोकराझारचे पोलीस अधीक्षक प्रतीक विजय कुमार यांनी दिली आहे.

मेवाणी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले होते की, गोडसेला (नथुराम गोडसे यांना) देव मानणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षांविरोधात शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करावे.