आरोग्य साहाय्य समितीचा ‘एक यशस्वी अभियान : औषधांच्या किमती न्यून झाल्या !’ वेबिनार पार पडला !
मुंबई – औषधाच्या विक्री मूल्यावर केंद्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे औषधनिर्मिती आणि विक्री आस्थापनांचा देशभरात लाखो कोटी रुपयांचा महाघोटाळा चालू आहे. औषधनिर्मिती आणि ती विक्री करणारी आस्थापने १०० रुपये मूल्याचे औषध मनमानी पद्धतीने ३ सहस्र ते ६ सहस्र रुपयांचे अधिकतम मूल्य (एम्.आर्.पी.) लावून विकत आहेत. या लुटीमध्ये औषध निर्मिती करणाऱ्या आस्थापनांसह (फार्मा कंपन्यांसह) घाऊक औषध विक्रेते (होलसेलर), किरकोळ औषध विक्रेते (मेडिकल स्टोअर), रुग्णालये, आधुनिक वैद्य आदींची मोठी साखळी आहे. याविरोधात आम्ही गेली ४ वर्षे लढा देत आहोत. या लढ्याची नोंद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात कर्करोगावरील (‘कॅन्सर’वरील) ५२६ औषधांवर ३० टक्क्यांचा ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लावला आहे. (म्हणजे १०० रुपयांचे औषध हे अधिकतम १३० रुपयांना विकू शकतो.) त्यामुळे ३६ लाख कर्करोग पीडित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासह आता ‘जीवनरक्षक औषधां’सह (लाईफ सेव्हिंग ड्रग्ज) सर्वच औषधांवर उत्पादन खर्चापेक्षा ३० टक्के अधिकतम दराने विकण्याची मर्यादा घालण्यात यावी, यासाठी जनतेने केंद्र सरकारकडे मागणी करावी, असे आवाहन तेलंगाणा येथील उद्योगपती तथा ‘निजामाबाद चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी केले आहे. ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांनी आयोजित केलेल्या ‘एक यशस्वी अभियान : औषधांच्या किमती न्यून झाल्या !’, या विषयावरील ‘वेबिनार’मध्ये ते बोलत होते. ‘या मागणीची पूर्तता लवकरात लवकर होण्यासाठी जनतेने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन शासनावर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे’, असेही श्री. सोमानी यांनी सांगितले.
‘आरोग्य साहाय्य समिती’चे डॉ. मानसिंग शिंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन करत श्री. सोमानी यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी श्री. सोमानी यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांतील आधुनिक वैद्य (डॉक्टर) तथा जिज्ञासू यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी सांगितलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
स्वस्त असणारी जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारक असतात !
बहुतांश जनतेला हे ठाऊक नसते की, बाजारातील ९७ टक्के औषधे ही जेनेरिक आहेत. ती कुणीही उत्पादन करू शकतो. त्यामुळे ती पुष्कळ स्वस्त असायला हवीत; मात्र अनेक प्रसिद्ध औषधनिर्मिती आस्थापने ती औषधे स्वत:चे नाव घालून १० ते २० पट अधिक दराने विकतात. रुग्णालये तथा डॉक्टर हेही स्वत:च्या स्वार्थासाठी रुग्णांना औषधांचे घटक (सॉल्ट) लिहून देण्यापेक्षा अनेकदा ‘ब्रँडेड’ (मोठ्या आस्थापनांचे) औषध लिहून देतात. ज्यात १० ते २० पट अधिक रक्कम लुटली जाते. मुळात औषधाचे घटक लिहून दिल्यामुळे स्वस्त असणारी जेनेरिक औषधे उपलब्ध होतात. मला स्वत:ला हृदयरोगावर प्रत्येक मासाला ३ सहस्र ५०० रुपयांची औषधे लागत होती. ती आता १५० रुपयांमध्ये उपलब्ध होत आहेत. तसेच जेनेरिक औषधे ‘ब्रँडेड’ औषधांप्रमाणेच परिणामकारकही असतात; पण अनेक रुग्णांना भ्रम असतो की, ‘ब्रँडेड’ औषधे चांगली असतात.
आधुनिक वैद्य आणि रुग्णालये यांना औषधे लिहून देतांना औषधांचे घटक (सॉल्ट) लिहून देणे बंधनकारक करावे !
‘लोकांना स्वस्त आणि चांगली औषधे मिळावीत यासाठी काय करावे’, हे सांगतांना श्री. सोमानी म्हणाले की, आज भारतात ८०० हून अधिक जेनेरिक किंवा ‘प्रधानमंत्री जनऔषधी’ दुकाने आहेत, जिथे स्वस्त औषधे मिळतात, तर १० लाखांहून अधिक अन्य औषधांची दुकाने आहेत, जेथे अधिक किमतीने औषधे विकली जातात. यावर उपाय म्हणून केंद्रशासनाने डॉक्टर आणि रुग्णालये यांना औषधे लिहून देतांना ब्रँडेड औषधे लिहून देण्यापेक्षा औषधांचे घटक (सॉल्ट) लिहून देणे बंधनकारक करावे. जेणेकरून लोकांना स्वस्तातील जेनेरिक औषधे सहज उपलब्ध होतील. यासाठी ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’ने पुढाकार घ्यावा.