मुंबई – शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मे मासाच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून या दिवशी अयोध्या येथे जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी १९ एप्रिल या दिवशी शिवसेना भवन येथे संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यात बैठक झाली, तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक झाली. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे उपलब्ध व्हावी, यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिले असल्याचे सांगितले. ‘मशिदींवरील भोंग्यांविषयी मनसेने ३ मेपर्यंत दिलेल्या समयमर्यादेविषयी सरकारच्या नियमावली आल्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवणार आहोत’, असे या वेळी मनसेचे नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी सांगितले.