१. जिज्ञासा
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘मलमपट्टी करायला ‘सेलोटेप’ का वापरत नाही ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘सेलोटेप’ला चिकटपणा पुष्कळ असतो. ती त्वचेला चिकटली, तर नंतर काढतांना त्वचेला अधिक त्रास होतो. त्या तुलनेत साधारणतः वापरण्यात येणारी ‘सर्जिकल टेप’ विशेष प्रकारे बनवली जाते. त्यामुळे तिचा ‘सेलोटेप’इतका त्वचेला त्रास होत नाही.’’
२. ‘वैद्यकीय वस्तूंचा विनयोग काटकसरीने होत आहे ना ?’, याकडे कटाक्ष असणे
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘अन्य आरोग्य सेवेत वापरण्यात येणाऱ्या वस्तूूंंचा वापर करतांना काटकसर केली जाते ना ?’, यासंबंधाने प्रश्न विचारला. मी त्यासंबंधी मला ठाऊक असलेले पुढील सूत्र त्यांना सांगितले, ‘‘झोपलेल्या रुग्णाच्या कमरेखाली ठेवायच्या मोठ्या चौकोनी तुकड्यातील खराब झालेला भाग टाकून देऊन खराब न झालेला भाग व्यवस्थित कापून पुन्हा त्याच रुग्णासाठी वापरला जातो.’’
३. ‘वैद्यकीयदृष्ट्या घेतली जाणारी काळजी स्वतःप्रमाणे अन्य साधकांचीही घेतली जावी’, असे वाटणारे प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले !
आम्ही दिवसातून २ वेळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रक्तदाब आणि तापमान पडताळतो. साधक ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी काय आणि किती अन्न-पाणी ग्रहण केले’, यांसारख्या नोंदी ठेवतात. या विषयाला अनुसरून परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘मी एकटा आहे, तरी माझ्यासाठी इतके सर्व कशाला करायला हवे ? रक्तदाब पडताळायला अन्य कुणी नाही का ? अशा गोष्टी करायला तुम्हाला का यावे लागते ?’’ मी म्हटले, ‘‘तसे करू शकणारे अन्य साधक आहेत. ते रक्तदाब पडताळणे, तसेच अन्य सेवाही करत असतात.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘माझी काळजी घेता, तशी सर्व रुग्णांची काळजी घ्यायला हवी.’’
४. वैद्यकीयदृष्टीने अल्प शिकलेले किंवा प्रशिक्षित साधकांनी चांगल्या प्रकारे सिद्ध होणे आवश्यक आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘आपण पूर्वी व्यवसाय करायचो, तेव्हा कुणी ‘एम्.डी.’ झालेला आधुनिक वैद्य रुग्णाला तपासायचा. मग तो रुग्णाला पाठवून द्यायचा. पुढे मग कुणी ‘एम्.बी.बी.एस्’ झालेला आधुनिक वैद्य या रुग्णाला तपासायचा. तो त्याचा रक्तदाब इत्यादी पहायचा. आता तसे का होत नाही ? मोठ्याने (म्हणजे अधिक शिक्षित व्यक्तीने) रक्तदाब तपासला, तर नंतरचे (वैद्यकीय दृष्टीने अल्प शिकलेले किंवा प्रशिक्षित) ते का करत नाहीत ? त्याचप्रमाणे त्यांनी तापमान, नाडी आणि रक्तातील प्राणवायू पडताळले, तर ते त्यांनी योग्य प्रकारे पडताळले आहे का, हे पहावे का लागते ? त्यांनी काय तपासले, त्यांच्या नोंदी पाहून तुम्ही त्यावर केवळ सांगायला हवे. पूर्वी ‘एम्.डी.’ झालेल्या आधुनिक वैद्याकडून कुणी रुग्ण तपासून घेऊन आधुनिक वैद्य गावी गेला, तर मासभर (एक महिना) कुणी ‘एम्.बी.बी.एस्’ झालेला (तुलनेने अल्प शिक्षण झालेला) आधुनिक वैद्य रुग्णाला तपासायचा. एका मासानंतर रुग्ण परत गेला की, मगच तो ‘एम्.डी.’ झालेला आधुनिक वैद्य त्याला तपासायचा. पूर्वी असेच होते ना ?’’
५. ‘स्वतःप्रमाणे सर्व साधकांची वैद्यकीयदृष्ट्या काळजी घ्यायला हवी’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे आणि या प्रसंगी आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांनी त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांनी हीच शिकवण दिल्याचे सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘माझ्यासाठी एवढे सर्व जण सेवा करायला का लागतात ?’, असे पुनःपुन्हा म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटले, ‘‘रुग्ण कोण आहे, तेही महत्त्वाचे आहे ना ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझ्या एकट्यासाठी करून काय उपयोग ? सगळ्यांविषयी तसे वाटायला हवे.’’ मी ‘हो’ म्हटले. त्यानंतर मी त्यांना माझ्या जीवनातील पुढील प्रसंग सांगितला, ‘‘मला प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) प्रथम दर्शन झाले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तू आता प्रत्येक रुग्ण तपासतांना ‘मला तपासत आहेस’, हे लक्षात ठेव.’’ तेव्हापासून माझे तसे चालू आहे.’’ यावर परात्पर गुरु डॉ. आठवले हसले आणि म्हणाले, ‘‘असले हे सर्व आणि मी बोललो, तेही असे सर्वच, यांविषयी एक लेख लिहून द्या.’’ मी म्हटले, ‘‘आपण काय बोललात, ते मला पूर्ण आकलन झालेले नाही.’’ ते म्हणाले,‘‘मला तरी कुठे आकलन झाले आहे !’’ असे म्हणून ते मोठ्याने हसले.
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.३.२०२१)