‘नाटो’वर अप्रसन्न असलेले झेलेंस्की यांनी ‘युरोपियन युनियन’कडे साहाय्यासाठी हात पसरले !

  • रशिया-युक्रेन युद्धाचा ५४ वा दिवस

  • रशियाचे पश्‍चिमी युक्रेनमधील लुवियू शहरावर आक्रमण, ७ ठार !

दोन-चार देश मागेपुढे केले, तर ‘नाटो’ आणि ‘युरोपियन युनियन’ यांत समावेश असलेले देश सारखेच आहेत. जरी दोन्ही संघटनांची ध्येय-धोरणे वेगवेगळी असली, तरी शेवटी निर्णय घेणारे देश तेच आहेत. त्यामुळे झेलेंस्की यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल, असे दिसत नाही ! यातून पाश्‍चात्त्य शक्तींची आश्‍वासने म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’च होत, हे गेल्या दोन मासांतील अनुभवांतून प्रकर्षाने लक्षात येते !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – नाटोच्या (‘नॉर्थ अ‍ॅटलँटिक ट्रिटी असोसिएशन’च्या) सदस्य देशांकडून शस्त्रांचा पुरेसा पुरवठा न होणे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जर्मनी आणि फ्रान्स यांच्या सत्ताधार्‍यांना कीवला येण्याचे निमंत्रण दिल्यानंतरही कोणतेच उत्तर न आल्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी पुन्हा युरोपियन युनियनकडे साहाय्यासाठी हात पसरले आहेत. रशियाने १८ एप्रिल या दिवशी आक्रमणाची पद्धत पालटून अचानक पश्‍चिम युक्रेनचे सर्वांत मोठे शहर लुवियूवर आक्रमण केले. या आक्रमणामध्ये ७ लोक ठार झाल्याचे आणि मोठ्या प्रमाणात इमारतींची हानी झाल्याचे वृत्त आहे.

जून मासामध्ये युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळाल्यास युक्रेनला सैन्य आणि आर्थिक साहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा झेलेंस्की यांना वाटते. युनियनच्या सामायिक सैन्य तरतुदीच्या अंतर्गत युक्रेनला उघडपणे साहाय्य मिळू शकेल, असे ते म्हणाले.