प्रतिदिन धर्मप्रसार करण्याचा पुणे येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमींचा निर्धार !

पुणे, १८ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित २ दिवसांची हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा १५ एप्रिल या दिवशी पार पडली. या कार्यशाळेला उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्र संघटक होऊन धर्मप्रसाराच्या कार्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करण्याचा निर्धार केला. दोन्ही दिवसांच्या सत्रात राष्ट्र-धर्मावर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. १६ एप्रिल या दिवशी सकाळच्या सत्रात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश जोशी आणि सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. रश्मी नाईक यांनी नामजपाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. प्रसाद येवले – मी दोन-अडीच वर्षांपूर्वी समितीच्या संपर्कात आलो. तेव्हा मनाला शांती आणि प्रसन्नता लाभली. जीवनाचे ध्येय मिळाले. बाहेरच्या रज-तम वातावरणापेक्षा येथील सात्त्विक वातावरण मनाला प्रसन्न करते. प्रत्येक हिंदू, तसेच धर्मप्रेमी हा ‘हिंदु संघटक’ झाला पाहिजे.

२. श्री. रवींद्र गाडे – देवाच्या कृपेने कार्यशाळेत पुष्कळ विषय शिकायला मिळाले. साधनेचे महत्त्व आणि कार्याची दिशा कशी असावी ? हे लक्षात आले. त्याप्रमाणे यापुढे मी कृती करणार आहे.

श्री. रवींद्र गाडे यांच्या भाचीचे लग्न १५ एप्रिल या दिवशी असतांनाही ते १४ एप्रिल या दिवशी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

३. श्री. विनायक घोडके – कार्यशाळेला येतांना माझ्या मनात नकारात्मक विचार होते. ‘दोन दिवस कार्यशाळेत बसायला जमेल का ?’ असे वाटत होते; परंतु येथे आल्यानंतर प्रार्थना, साधना, नामजप यांचे महत्त्व समजले. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयाची मांडणी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. कार्यात सहभाग कसा असावा ? बाहेर गेल्यावर योग्य कृती कशी करावी ? हे समजले. विषय पूर्णपणे आकलन होण्यास साहाय्य झाले. इतरांना सांगण्याची प्रेरणा, स्फूर्ती मिळाली. आता कृतीशील प्रयत्न करीन.

४. वैष्णवी देशपांडे, नांदेड – दोन दिवस कसे गेले समजले नाही. आनंद, परमानंद यांची अनुभूती घेता आली. जे जे मिळाले ते ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करीन.