भोंग्यांची नियमावली निश्चित करण्यासाठी आज पोलीस महासंचालकांसमवेत होणार मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक !

न्यायालयाच्या निर्णयानंतरही कारवाई न झालेल्या भोंग्यांवर राज ठाकरे यांच्या चेतावणीनंतर कारवाई होण्याची शक्यता !

मुंबई, १८ एप्रिल (वार्ता.) – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे आयुक्त यांना धार्मिक स्थळांवरील भोग्यांविषयी धोरण निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. १९ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, राज्यातील सर्व आयुक्त आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भोंग्यांविषयीची नियमावली निश्चित होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही कारवाई न झालेल्या भोंग्यांवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चेतावणीनंतर कारवाई होण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १८ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भोंग्यांविषयीची नियमावली कशी असावी ?, याविषयी चर्चा केली. दोघांमध्ये दीड घंटा चर्चा झाली. ठाणे येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास मशिदींपुढे हनुमान चालिसा लावण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे. यापूर्वी वर्ष २००५ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने, वर्ष २०१५ मध्ये  मुंबई उच्च न्यायालयाने, तर वर्ष २०१९ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविषयीचा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगा लावण्यावर बंदी आहे, तसेच भोंगे लावण्यासाठी प्रशासनाची अनुमती आवश्यक आहे. दिवसा ५५ डेसिबल, तर रात्रीच्या वेळी ४० डेसिबल या ध्वनीवर्धकांच्या आवाजाची मर्यादा देण्याचा नियम आहे.