नवी मुंबई – ए.टी.एम्.मध्ये भरावयाचे ८२ लाख ५० सहस्र रुपये चोरणाऱ्या संदीप दळवी याला एन्.आर्.आय. पोलिसांनी अटक केली आहे. सी.एम्.एस्. सेक्युरिट्रान्स इंडिया प्रा.लि. हे आस्थापन नवी मुंबईतील काही अधिकोषांच्या ए.टी.एम्.मध्ये रोकड भरण्याचे काम करत आहे. १३ एप्रिल या दिवशी वरील आस्थापनाच्या एका गाडीद्वारे नवी मुंबईतील अधिकोषांच्या ए.टी.एम्.मध्ये रक्कम भरण्याचे काम चालू होते. त्या वेळी गाडीतील काही कर्मचारी बामणडोंगरी येथे एका ए.टी.एम्. यंत्रामध्ये पैसे टाकून बाहेर आले, तर त्यांना गाडी जाग्यावर दिसली नाही. या प्रकरणी त्यांनी एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पडताळणीअंती गाडीचा चालक आरोपी संदीप दळवी याला २४ घंट्यांत पनवेल बसस्थानक येथून अटक केली. त्याच्याकडून ८१ लाख ४१ सहस्र ८०० रुपये कह्यात घेण्यात आले.