बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी कधीच चर्चा झाली नाही ! – जेम्स लेन, अमेरिका

जेम्स लेन यांनी वादग्रस्त पुस्तक लिहितांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संदर्भ दिल्याचे सांगून त्यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण !

जेम्स लेन यांनी पुस्तकात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. त्यांनी जे पाप केले, त्याचे खापर शिवशाहीर पुरंदरे यांच्यावर फोडून त्यांची नाहक अपकीर्ती करण्यात आली. ब्राह्मणद्वेषापायी शिवशाहीर यांच्यावर चिखलफेक करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक

डावीकडून जितेंद्र आव्हाड, लेखक जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे

मुंबई – माझ्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्रोेत नव्हते. या पुस्तकासाठी मला कुणीही माहिती पुरवलेली नाही. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी माझी कधीही एका शब्दानेही चर्चा झालेली नाही, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त लेखन करणारे अमेरिकेतील लेखक जेम्स लेन यांनी दिली आहे. ‘इंडिया टुडे’च्या प्रतिनिधीने ‘ई-मेल’द्वारे घेतलेल्या मुलाखतीमध्ये जेम्स लेन यांनी वरील माहिती दिली.

या मुलाखतीमध्ये जेम्स लेन यांनी म्हटले की, पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रख्यात समर्थक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते; पण मला खेद वाटतो की, त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय विवादाचे साधन झाले आहे. पुस्तकामध्ये मी कोणताही ऐतिहासिक दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराज यांचा अपमान केला, अशी टीका करणार्‍यांनी पुस्तक नीट वाचलेले नाही. मी केवळ कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही.

१. जेम्स लेन यांनी त्यांच्या ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण केले आहे. या पुस्तकासाठीचा संदर्भ त्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिल्याची राळ उठवून संभाजी ब्रिगेड यांसह काही पुरोगाम्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती.

२. काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क येथे झालेल्या सार्वजनिक सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांना ‘सॉफ्टटार्गेट’ करण्यात आल्याचे म्हटले होते, तसेच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर महाराष्ट्रात जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला होता.

३. यावर उत्तर देतांना शरद पवार यांनी ‘जेम्स लेनच्या प्रकरणात बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी काही बोललो असेन, तर त्याचा मला पश्‍चात्ताप वाटत नाही, तर अभिमान वाटतो’, असे म्हटले होते.

४. जेम्स लेन यांच्या स्पष्टीकरणाने मात्र बाबासाहेब पुरंदरे यांना लक्ष्य करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

(म्हणे) ‘जेम्स लेन यांना कोण ‘मॅनेज’ करत आहे ?’ – जितेंद्र आव्हाड

याविषयी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘जेम्स लेन यांना कोण ‘मॅनेज’ करत आहे ?, याची कल्पना नाही. आधी त्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळा आणि मग बोला. जेम्स लेन याला आताच का बाहेर काढले गेले ? इतका गोंधळ झाला, त्या वेळी लेन याला कुठे गाडले होते ? महाराष्ट्राच्या अस्मितेशी मस्ती करू नका, अन्यथा परिणाम गंभीर होतील.’’ (जेम्स लेन यांच्या वादग्रस्त लिखाणाचे कुणीही समर्थन करू शकत नाही; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाचे खापर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर फोडून महाराष्ट्रात जे जातीयवादी राजकारण केले, त्याविषयी आव्हाड का बोलत नाहीत ? – संपादक)