गोवा राज्यातील मान्यवरांचे दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीचे उद्बोधक विचार !

हिंदूंना संस्कारित आणि संघटित करण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – ह.भ.प. सुहासबुवा वझे

ह.भ.प. सुहासबुवा वझे

आज अनेक हिंदूंना आपला धर्म, देव, कर्तव्य, संस्कार यांविषयी काहीच ठाऊक नाही. जगामध्ये आपल्या हिंदु धर्मासारखा सर्वश्रेष्ठ धर्म नाही. सध्या अनेक देश हिंदु संस्कृती स्वीकारत आहेत. ती भारतीय संस्कृती शिकवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. याविषयी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे अभिनंदन केले पाहिजे. हिंदूंना घडवण्याकरता ‘सनातन प्रभात’ अविरत प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या हिताचेच विषय हे नियतकालिक हाताळत असते. त्यामध्ये हिंदु धर्माचे संस्कार, स्वभावदोष निर्मूलन, सेवाभाव, संतांची माहिती, देवाविषयीची पूर्ण माहिती, त्याचप्रमाणे धर्मांतर, लव्ह जिहाद याही महत्त्वांच्या विषयांवर ते समाजाला जागृत करत आहे. आज समाजात दुःख आहे, याला कारण आपण देव, धर्म, संस्कार, सत्यता सोडली, हे एकमेव कारण होय ! आपला हिंदु धर्म उत्तम संस्कारांनी भरलेला आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे या कलियुगातील अवतारी पुरुष आहेत. सनातनचे अनेक साधक आणि संत निस्वार्थपणे हिंदु धर्मासाठी कार्य करत आहेत. आपण सर्वांनी तन-मन-धनाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. प्रत्येक सणाची, उत्सवांची, संतांची माहिती ‘सनातन प्रभात’मध्ये वाचायला मिळते. सर्वांनीच दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचावा. माझ्यासारख्या कीर्तनकारालासुद्धा दैनिक ‘सनातन प्रभात’मधून पुष्कळ शिकायला मिळते.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी नतमस्तक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ला माझ्या लाख लाख शुभेच्छा !  सर्वे जनः सुखिनो भवन्तु ।

– कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे, बोरी, फोंडा, गोवा. 

दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला लागल्यापासून राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्व यांच्या बिजाला प्राणवायू मिळायला प्रारंभ झाला !

श्री. दत्तात्रय आमोणकर

कोरोनाच्या काळात गेली २ वर्षे मी कोणतेही दैनिक वाचणे बंद केले होते; कारण प्रतिदिन पहिल्या पानावर केवळ कुणा ना कुणाच्या मृत्यूच्या बातम्या झळकत होत्या. लहानपणापासून वर्तमानपत्र वाचण्याची सवय होती. त्या वेळी शेवटून दुसरे पान पहिल्यांदा वाचायचो; कारण या पानावर सर्व क्रीडा वृत्ते छापून यायची आणि नंतर पहिल्या पानापासून उर्वरित दैनिक वाचायचो. काळ पुढे सरकत गेला, तशी माझीही वर्तमानपत्र वाचण्याची पद्धत पालटत गेली. काही काळ मी नोकरीसाठी वर्तमानपत्रांतील जाहिरातीचे पान वाचायला प्रारंभ केला होता.

त्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक हातात आला. प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला प्रारंभ झाल्यापासून लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांना पुन्हा झळाळी आली. लहानपणी बसून स्तोत्रे आदी म्हणायचो त्यांचा अर्थ आणि महत्त्व समजले. यातून सनातन धर्माचे आणि साधनेचे महत्त्व समजले आणि ज्ञानात भर पडायला प्रारंभ झाला.

लहानपणी रा.स्व. संघाच्या शाखेत जात असल्याने राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्व थोड्या प्रमाणात रुजले होते अन् ‘सनातन प्रभात’ वाचायला प्रारंभ केल्यापासून त्या बिजाला प्राणवायू मिळायला प्रारंभ झाला. ‘सनातन प्रभात’मध्ये निरंतर येणार्‍या हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीच्या बातम्यांमुळे आज केवळ माझाच नाही, तर सामान्यातील सामान्य माणसाचा आत्मविश्‍वास वाढला आहे.

दैनंदिन परात्पर गुरुदेवांचे (‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे) तेजस्वी विचार वाचून, मनातील हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत सतत हुंकार देत असते.

– श्री. दत्तात्रय आमोणकर, मडगाव, गोवा.

जनतेच्या आत्म्याला ऊर्जितावस्था आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘सनातन प्रभात’ने केले ! – महेश पारकर, साहित्यिक, गोवा

श्री. महेश पारकर

१. गेली ७० वर्षे प्रसारमाध्यमांनी भ्रामक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे हिंदु समाज गाफील राहिला !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील बातम्या आणि इतर वर्तमानपत्रांतील बातम्या यांमध्ये आपल्याला निश्‍चितच भेद आढळेल. हिंदु समाजावरती होणार्‍या आघातांशी संबंधित बातम्यांमध्ये हा भेद आपल्याला नेहमीच प्रकर्षाने जाणवतो. हिंदूंवरील आघातांच्या बातम्या सत्याच्या आधारे दैनिक ‘सनातन प्रभात’ मांडत असते, तर इतर वर्तमानपत्रे किंवा तमाम दूरचित्रवाणी चॅनल्स याच बातम्या वेगळ्या प्रकारे रंगवून जनतेसमोर आणतात. गेली ७० वर्षे प्रसारमाध्यमांनी मूळ बातम्यांमध्ये खोट्या आणि भ्रामक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आपला बहुसंख्य हिंदु समाज नेहमी गाफील राहिला. यामुळे हिंदु समाजापुढील अनेक समस्या दुर्लक्षित राहिल्या. त्यांच्यावर वेळीच उपाययोजना न काढल्यामुळे त्या अधिकाधिक जटील होत गेल्या.

२. जनतेमध्ये सत्य परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता दैनिक ‘सनातन प्रभात’ने निर्माण केली !

अल्पसंख्यांकांना काय वाटेल ? त्यांच्या भावना दुखावल्या तर नाहीत ना ? त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढीस लागणार नाही ना ? आपला बंधूभाव, जातीय आणि धार्मिक सलोखा बिघडणार तर नाही ना ? अशा प्रश्‍नांचा विचार आपले समाजधुरीण अन् कायदेपंडित सतत करत असतात आणि त्या समर्थनार्थ घटनेतील विविध कलमांचा आधार देत आपल्याला गुन्हेगाराच्या पिंजर्‍यामध्ये उभे करतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ने मात्र स्थापनेपासूनच प्रसिद्धीसंदर्भात कणखर भूमिका घेतलेली आहे. अल्पसंख्य आणि बहुसंख्य अशा तात्कालिक मलमपट्ट्या लावून जनतेला गाफील ठेवण्यापेक्षा सत्य परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता दैनिक ‘सनातन प्रभात’ने निर्माण केली आहे. देशातील राजकारण्यांनी लोकशाहीच्या नावाखाली एका बाजूने देशाला लुटले, तर दुसर्‍या बाजूने प्रसारमाध्यमांनी भ्रामक पद्धतीच्या वृत्तप्रसाराद्वारे जनतेचा आत्मा निष्काळजी आणि देशहिताविषयी उदासीन ठेवला आहे. जनतेच्या आत्म्याला ऊर्जितावस्था आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. मनुष्याला त्याने केलेल्या चुकांविषयीची जाणीव करून देऊन त्या सुधारण्यासाठी प्रेरित आणि प्रवृत्त करण्याएवढे पुण्य कार्य दुसरे नाही. ‘सनातन प्रभात’ने स्थापनेपासून हीच दिशा अंगीकारली आहे. हीच दिशा आपल्या समाजाचे किंबहुना देशाचे भले करणारी आहे.

३. सनातनचे कार्य अधिक व्यापक बनून संपूर्ण देशात पसरण्याची वेळ आली आहे !

‘सनातन प्रभात’ नियतकालिक संपूर्ण देशात पोचणे आवश्यक आहे. सत्यनिष्ठेची बाजू घेतल्यामुळे ज्या ठिकाणी ‘सनातन प्रभात’ आहे, केवळ तेथील जनतेच्या विचारसरणीमध्ये पालट झाल्याचे चित्र दिसते. हा पालट अल्प प्रमाणात आहे. संपूर्ण देश व्यापून आपल्या हिंदु धर्मविषयक महानतेची चेतना संपूर्ण देशबांधवांच्या मनामध्ये चेतवली पाहिजे. ही चेतना देशबांधवांच्या अंतःकरणामध्ये जागृत आहे; परंतु सध्याच्या घडीला ‘सनातन प्रभात’मधील धर्मशिक्षणाच्या माध्यमातून ती चेतना प्रखर होण्याची आवश्यकता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २३ वर्षांपूर्वी रोवलेली हिंदु राष्ट्र स्थापनेची मुहूर्तमेढ आणि आज त्याच दिशेने अखंडितपणे होत असलेले मार्गक्रमण आपण पहात आहोत. परात्पर गुरुदेवांची या महान कार्यामागील शिस्तबद्धता आणि त्या आधारे साधक घडवण्याची कार्यपद्धत तर अद्वितीय अशीच आहे. सर्व बाजूंनी अनास्था, मरगळ आणि कमालीची उदासीनता पसरलेली आपली ही समाजव्यवस्था असून, त्या व्यवस्थेमध्ये सनातनने शिस्तबद्ध कार्यप्रणालीद्वारे जीव ओतण्याचे कार्य केले आहे. हे कार्य आता अधिक व्यापक बनून संपूर्ण देशात पसरावे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी केवळ १ वर्षाचा कालावधी आहे. हे पहाता सनातनचे कार्य वृद्धिंगत करून देशव्यापक करण्यासाठी भगिरथ प्रयत्नांची आवश्यकता आहे.

– श्री. महेश पारकर, कोकणी आणि मराठी साहित्यिक, शिरोडा, गोवा.

म्हणून आता

आळस नाही, विश्रांती नाही ।

देशहित साधण्यात तडजोड नाही ॥ १ ॥

हिंदु राष्ट्र स्थापनेची पहाट समीप आली ।

श्रम, कष्ट उपसण्याविना पर्याय नाही ॥ २ ॥

श्री. महेश पारकर