सध्या विजेच्या टंचाईमुळे आपत्कालीन स्थिती म्हणून शासनाने अनेक ठिकाणी भारनियमन चालू केले आहे, तसेच ‘आवश्यकता नसतांना उपकरणे बंद ठेवा’, ‘विजेची बचत करा’, ‘वीज जपून वापरा’, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. अशा सूचना आता देणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे. एकूणच राज्यासमोर भारनियमनापासून मुक्ती, सर्वांना पुरेशी आणि खात्रीशीर वीज, वीज गळतीला रोखणे आणि वीजनिर्मिती करणे सर्वांत मोठे आव्हान आहे.
आपल्याकडे वीज किती आहे, यापेक्षा तिचा वापर कसा होतो आणि तो काटकसरीने कसा करायला हवा, याचे प्रशिक्षण जनतेला देणे आवश्यक आहे. वीजनिर्मितीमधील अडचणी दूर करणे जेवढे महत्त्वाचे आहे, किंबहुना त्याहून अधिक विजेचा वापर योग्य प्रकारे करणेही आवश्यक आहे. शहरी भागांत रहाणारी मंडळी बऱ्याचदा विजेचा अपव्यय करतात. त्याचा परिणाम आजही अनेक गावे अंधारात आहेत. त्यामुळे गावातील कितीतरी छोटे उद्योग धुळीस मिळाले आहेत.
हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येकाने घरामध्ये विजेचा वापर करतांना काळजी घ्यायला हवी. आवश्यकता नसल्यास तात्काळ वीज उपकरणे, उदा. पंखा, दिवे बंद करणे, तसेच वातानुकूलित यंत्राचा वापरही आवश्यकता असल्यासच करणे. बऱ्याच शासकीय, तसेच खासगी कार्यालयांमध्ये दिवे, पंखे, संगणक विनाकारण चालू असतात. काम नसेल तेव्हा ते बंद केल्यास विजेची बचत होईल.
विजेच्या विषयी स्वावलंबी व्हायचे असेल, तर आपल्याकडे असलेल्या इंधन स्रोतांचा पुरेपूर वापर करावा लागेल, तसेच वीजनिर्मिती केंद्रांतून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आखायला लागतील. त्यासाठी वीज बचत करून आणि वीज उत्पादन केंद्रांची कार्यक्षमता वाढवून विजेचे उत्पादन वाढवायला हवे, तसेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवायला हवा. सौर गरम पाण्याचे संयंत्र, सौर कंदील, घरात सौर दिवे, सौर पथ दिवे, सौर पंप, पवन-सौर संकरित वनस्पती, बायोगॅस संयंत्रे वापरून ऊर्जा संवर्धन करता येईल आणि ऊर्जाही वाचवता येईल. प्रत्येक नागरिकाने चंगळ थांबवून विजेचा आवश्यकतेनुसारच वापर केल्यास देशात वीजटंचाई जाणवणार नाही आणि सर्वांना पुरेशी वीज मिळेल.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे