अध्यात्माचे पुढील टप्पे गाठल्यास साधनेतील खरा आनंद अनुभवता येतो ! – पू. अशोक पात्रीकर

यवतमाळ येथे पार पडली हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा !

मार्गदर्शन करतांना पू. अशोक पात्रीकर आणि सौ. सुनंदा हरणे

यवतमाळ, १४ एप्रिल (वार्ता.) – शालेय जीवनामध्ये पहिली, दुसरी, तिसरी असे शिक्षणाचे टप्पे गाठत पुढे जायचे असते, त्याचप्रमाणे अध्यात्मामध्येही नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच भावजागृती असे पुढचे पुढचे टप्पे गाठत गेल्यास साधनेतील खरा आनंद निश्चितच अनुभवता येतो. नामजपाच्या पायावर साधनेची इमारत उभी रहाणार आहे. त्यामुळे नामजप हा साधनेचा पाया असून तो भक्कम असला पाहिजे, असे अनमोल मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. येथील वडगावमधील चिंतामणी देवालय या ठिकाणी झालेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत ते बोलत होते. ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका सौ. सुनंदा हरणे यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयावर, तर हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मूलभूत संकल्पना’ या विषयावर बोलत होते. कार्यशाळेमध्ये आदर्श संपर्क कसा करावा ?, सुराज्य अभियान, सामाजिक प्रसारमाध्ये, प्रथमोपचार, तसेच आध्यात्मिक उपायांचे महत्त्व यांविषयीही माहिती देण्यात आली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. कार्यशाळेत येण्यापूर्वी काही धर्मप्रेमींना शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवत होता; मात्र कार्यशाळेतनंतर सर्वांचे त्रास दूर होऊन उत्साह आणि आनंद जाणवला.

२. धर्मप्रेमी सौ. अनुराधा अर्धापूरकर यांचे ८ दिवसांपूर्वी पोटाचे शस्त्रकर्म होऊनही त्या कार्यशाळेला पूर्णवेळ उपस्थित होत्या.

३. प्रत्येक धर्मप्रेमी मनोगत व्यक्त करत असतांना सर्वांची भावजागृती होत होती.

४. कार्यशाळेतील काही धर्मप्रेमी ५५ ते ६० किलोमीटर अंतरावरून आले होते.

५. गटचर्चेमध्ये सहभागी झालेल्या धर्मप्रेमींनी कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला.

अभिप्राय

१. कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये भगवंताचे अस्तित्व जाणवत होते. – श्री. स्वप्नील वाटकर, पार्डी, ता. घाटंजी (यवतमाळ)

२. हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तन, मन आणि धन या माध्यमातून सहभागी होईन अन् आध्यात्मिक उपायांना प्रारंभ करीन. – श्री. सुनील मोहितकर, यवतमाळ

३. हिंदु राष्ट्र निर्माण करणे, हा उद्देश ठेवून अशा कार्यशाळा नियमित व्हायला पाहिजेत. – श्री. रंगराव राऊत, यवतमाळ

४. आमच्या गावात एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या घरी कार्यक्रम असल्याने गावातील सर्वजण तेथे जाणार होते. मला मात्र कार्यशाळेत सहभागी होण्याची इच्छा होती. त्यामुळे मी कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडा वेळ थांबून लगेचच कार्यशाळेत आले. कार्यशाळेनंतर ‘मी काहीतरी करू शकते’, असा माझा आत्मविश्वास वाढला. ‘धर्मकार्यामध्ये इतरांना जोडले पाहिजे’, असे मला वाटत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या व्यासपिठावरून बोलण्याची संधी मिळाल्यामुळे आत्मबळ वाढले. – सौ. उषाताई सावदे, दारव्हा, यवतमाळ.

५. इतरांशी कसे वागावे ? कसे बोलावे ? आचरण कसे असावे ? स्वतःचे रक्षण कसे करावे ? याविषयी शाळेमध्ये शिकवले जात नाही. समितीच्या माध्यमातून ते शिकवले जात असल्याने समितीचे कार्य कौतुक करण्याजोगे आहे. समितीच्या प्रत्येक कार्यात सहभागी व्हायला आवडेल ! – कु. ज्ञानेश्वरी सावदे (वय १३ वर्षे) (सौ. उषाताई सावदे यांची मुलगी)

सहकार्य

१. चिंतामणी देवालयाचे विश्वस्त श्री. राऊत यांनी सभागृह विनामूल्य दिले, तर मंदिराचे पुजारी श्री. मनोज जंगमवार यांचे कार्यशाळेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.

२. रुमाले बिछायतच्या वतीने सर्व साहित्य विनामूल्य मिळाले.

३. ‘कुलस्वामिनी साऊंड सिस्टिम’ने ध्वनीयंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.