विद्यार्थ्यांनो, ‘गायकी’ म्हणजे काय ?’, हे समजून घ्या आणि गायकी विकसित करण्यासाठी विविधांगी अभ्यास करा !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. किरण फाटक

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत.

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (३१.३.२०२२)

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

‘एकदा एक विद्यार्थिनी मला म्हणाली, ‘‘सर, आता मी गायकी शिकण्यासाठी कुणाकडे तरी जाणार आहे.’’ मी तिला विचारले, ‘‘गायकी म्हणजे काय ?’, हे तुला ठाऊक आहे का ?’’ या प्रश्नावर ती अनुत्तरित झाली. बऱ्याच विद्यार्थ्यांना ‘गायकी’ या शब्दाचा अर्थच ठाऊक नसतो.

१. गायकी

‘गायकी’ म्हणजे रागसंगीत तर्कसंगत मांडण्याची पद्धत. सध्या ‘ख्यालगायन’ (टीप १) प्रचारात आहे. त्यात ‘आलाप’ (टीप २), ‘बोल’ आणि ‘तान’ (टीप ३) ही मुख्य अंगे येतात. या अंगांचा सखोल अभ्यास झाल्यावरच गायकीचा विचार करणे योग्य ठरते.

टीप १ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे संथ, मध्य लयीत गायले जाणारे बोलगीत.

टीप २ – रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार, म्हणजेच ‘आलाप’ होय. स्वरांचा उच्चार केवळ ‘आऽऽऽ’कारात करणे, म्हणजे ‘आलाप’.

टीप ३ – रागातील स्वरांच्या जलद गतीने केलेल्या विस्तारास ‘तान’, असे म्हणतात.

२. गायकीच्या अंतर्गत करावयाचा विविधांगी अभ्यास

२ अ. स्वर, लय (टीप ४) आणि ताल (टीप ५) यांचा अभ्यास : या अंगांचा अभ्यास चालू करण्याआधी स्वरांचा सर्व दिशांनी अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास फार मोठा असतो. यासाठी २ – ३ वर्षे द्यावी लागतात. नंतर लय आणि ताल यांचा अभ्यास करावा लागतो.

टीप ४ – लय म्हणजे गती. दोन मात्रांमधील सारखे धावते अंतर म्हणजे लय.

टीप ५ – नियमबद्ध मात्रांचा समूह म्हणजे ताल.

२ आ. रागाचा अभ्यास : त्यानंतर येतो रागाचा (टीप ६) अभ्यास !रागाच्या अभ्यासात रागाचे चलन अभ्यासावे लागते. त्यात वादी स्वर (टीप ७)/ संवादी स्वर (टीप ८), रागाचा स्वभाव, रागाची गती, रागातील स्वरसंगती इत्यादींचा विचार करावा लागतो. नंतर येतो बंदिशींचा (टीप ९) अभ्यास ! वेगवेगळ्या तालांतील बंदिशी शिकाव्या लागतात. त्यातून रागाची वेगवेगळी रूपे जाणून घ्यावी लागतात. बंदिशीतले विषय, बंदिशीतील भावना आणि बंदिशीमधील रागाची मांडणी समजून घ्यावी लागते.

टीप ६ – ज्या नियमबद्ध स्वरसमुहामुळे सर्वांचे मनोरंजन होते आणि रसनिर्मिती होते, त्या स्वरसमुहास ‘राग’, असे म्हणतात.

टीप ७ – रागातील प्रमुख स्वरास ‘वादी स्वर’, असे म्हणतात. वादी स्वराचा उपयोग रागात प्रामुख्याने आणि अधिक प्रमाणात केला जातो.

टीप ८ – रागातील दुसऱ्या प्रमुख स्वरास ‘संवादी स्वर’, असे म्हणतात. हा स्वर वादी स्वराच्या खालोखाल महत्त्वाचा असतो.

टीप ९ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा द्रुतलय यांत गातात.

२ इ. नंतर गमकेचे (टीप १०) प्रकार, तानांचे प्रकार, ‘व्हॉईस मॉड्युलेशन’ (टीप ११) शिकून घ्यावे लागते. हे सगळे शिकल्यावर ‘गायकी’चा विचार करावा.

टीप १० – श्रोत्यांच्या मनास सुखावह ठरतील, असे स्वरांचे कंपन करणे, म्हणजे ‘गमक’.

टीप ११ – ‘श्रोत्यांना आपला (गायकाचा) आवाज ऐकू येत आहे कि नाही ?’, याचा अभ्यास करून आवाजात योग्य ते परिवर्तन करणे.

३. ‘गायकी शिकणे’, म्हणजे काय ?

‘आलाप, बोल, तान, सरगम (टीप १२) आणि लयकारी या ख्यालगायनातील घटकांचा विशिष्ट रागात अन् विशिष्ट बंदिशीत किती प्रमाणात आणि कसा अंतर्भाव करावा ?’, हे शिकणे हणजे गायकी शिकणे. यात स्वानुभवावरून पुष्कळ शिकता येते. ‘आपला आवाज आलापांसाठी योग्य आहे कि तानेसाठी ?’, हे जाणून घेणे निकडीचे आहे. त्याचप्रमाणे ‘मला आलापातून, संगीतातील ‘बोल’ या अंगातून कि ‘तान’ या अंगातून आनंद प्राप्तहोतो ?’, हेही स्वतः जाणून घेणे पुष्कळ महत्त्वाचे असते.

टीप १२ – रागाची कल्पना आणि चलन लक्षात येण्यासाठी एखाद्या रागात, तालात बसवलेल्या स्वररचनेस ‘सरगम गीत’ किंवा ‘स्वरमालिका’, असे म्हणतात. या गीतात केवळ स्वरच गायले जातात. शब्द येत नाहीत.

४. आपली गायकी कशी विकसित करावी ?

थोडक्यात आपणच स्वसंवादातून ‘आपली गायकी कशी विकसित करावी ?’, हे जाणून घेणे अधिक योग्य असते. गायकी कुणी शिकवून येत नाही. ‘मूळ तत्त्वे (आलाप, बोल, तान) गळ्यातून कशी काढावीत ?’, ते शिकून घ्यावे लागते. पुढे आपले आपणच विकसित व्हायचे असते. आपणच आपले गुरु असतो. गुरूंची नक्कल करणे, म्हणजे गायकी आत्मसात करणे नव्हे. जसा प्रत्येक माणूस देवाने वेगळा घडवला आहे, तशी प्रत्येकाची गायकीही वेगळी दिसली पाहिजे.’

– (पू.) श्री. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे.(३०.५.२०२१)