प्रभु श्रीरामाविषयी भावप्रयोग घेतल्याने भावस्थितीत रहाण्यास साहाय्य होणे

१. भावप्रयोगात ‘रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्र आले असून परात्पर गुरु डॉ. आठवले रामावतारात सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि सगळे साधक-साधिका आनंदी आहेत’, असे वाटणे

कु. ऐश्वर्या रायकर

व्यष्टी साधनेच्या आढाव्यात गुढीपाडव्यापासून प्रतिदिन श्रीरामावर एक भावप्रयोग घ्यायचे ठरवले होते. तेव्हापासून मला प्रभु श्रीरामाविषयीचे बरेच प्रसंग लक्षात येऊ लागले. पहिल्या दिवशी एका साधिकेने रामराज्याच्या संबंधित एक भावप्रयोग घेतला. तो ऐकत असतांना माझी भावजागृती होत होती. ‘रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्र आले आहे आणि परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) रामावतारात सिंहासनावर विराजमान झाले आहेत’, असे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागले. ‘सगळे साधक-साधिका आनंदी आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी वातावरणातील आनंदही मला अनुभवता येत होता.

२. भावप्रयोगाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती कृतज्ञताभाव वाढणे

‘भगवान श्रीरामाविषयी कोणता भावप्रयोग घेऊ ?’, असा विचार करत असतांनाच माझी भावजागृती व्हायची. ‘आढाव्यात साधक कोणता भावप्रयोग घेणार आणि त्यातून आपल्याला किती आनंद मिळणार’, हे जाणण्याची मला उत्सुकता असायची. ‘भावप्रयोगाच्या माध्यमातून गुरुदेवांप्रती माझा कृतज्ञताभाव वाढला आहे’, याची मला जाणीव झाली. भावप्रयोगाविषयी विचार करत असतांना मला भावस्थितीत रहाण्यास साहाय्य झाले.

– कु. ऐश्वर्या रायकर (वय २१ वर्षे) (२४.४.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक