बिहारमध्ये तब्बल ५०० टन वजनाचा पोलादी पूल विघटित करून साहित्य चोरले !

पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनीच चोरांना साहाय्य केल्याचा पोलिसांना संशय !

असे असेल, तर सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचार कोणत्या थरापर्यंत पोचला आहे, याची कल्पना येऊ शकते. अशा भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांना कामावरून बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा का देऊ नये ? – संपादक

सासाराम (बिहार) – येथे सरकारी अधिकारी असल्याचे भासवणार्‍या काही लोकांनी ६० फूट लांबीचा पोलादी पुलाचे जोडलेले भाग विघटित करून साहित्य चोरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५०० टन वजनाचा हा पूल नासीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमियावर खेड्यातील आरा कालव्यावर वर्ष १९७२ मध्ये बांधण्यात आला होता. पाटबंधारे खात्याचे अधिकारी असल्याचे भासवणार्‍या काही लोकांच्या गटाने हा कार्यरत नसलेला पूल ‘गॅस कटर’ आणि ‘अर्थमूव्हर्स’ (माती आणि अन्य साहित्य हालवणारे यंत्र) यांच्या साहाय्याने ३ दिवसांत सुटा केला आणि पूल बांधण्यासाठी वापरलेले साहित्य चोरून नेले.

स्थानिकांंना याची जाणीव होईपर्यंत आणि त्यांनी पोलिसांना कळवेपर्यंत हे चोरटे भंगारासह पसार झाले होते. ‘पाटबंधारे खात्याच्या स्थानिक अधिकार्‍यांच्या साहाय्याने ही संपूर्ण कामगिरी पार पाडण्यात आल्याचे दिसते’, असे नासीरगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.