युरोपियन युनियनने रशियन तेलावर घातली संपूर्ण बंदी !

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, इंटरपोल, ‘वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन’, ‘युनेस्को’ आदी आंतरराष्ट्रीय संघटनांनीही रशियावर बंदी लादावी, अशी मागणी !

ब्रुसेल्स (बेल्जियम) – युरोपियन युनियनच्या संसदेने रशियाकडून आयात केले जाणारे तेल, कोळसा, परमाणू इंधन आणि गॅस या उत्पादनांवर संपूर्ण बंदी लादण्यात आल्याचे घोषित केले. संसदेत यासंदर्भातील ठराव संमत करण्यात आला. यासमवेत जागतिक स्तरावर बँकांमध्ये करण्यात येणाऱ्या पैशांच्या देवाण-घेवाणीचा समन्वय करणाऱ्या ‘स्विफ्ट’ या कार्यप्रणालीतूनही रशियातील सर्व बँकांना बाहेर काढण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.

संसदेत हा ठराव संमत करण्यात आला असला, तरी युरोपियन युनियनच्या सदस्य देशांना तो बंधनकारक नाही. जे देश रशियाच्या तेल, गॅस आदी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, त्यांना हा निर्णय बंधनकारक नाही. संसदेत संमत झालेल्या ठरावामध्ये रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, इंटरपोल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच ‘युनेस्को’ अन् अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांमधूनही बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली.