वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन तब्बल दीड मास होत आला असून आता अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यास आरंभ केला आहे. अमेरिकेकडून पुतिन यांच्या दोन्ही मुलींवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुतिन यांच्या वैयक्तिक संपत्तीवर परिणाम होणार आहे.
पुतिन यांची मोठी मुलगी ३६ वर्षीय डॉ. मारिया वोरनस्लोव्हा सध्या रशियाच्या ‘प्रेसिडेंट हाऊस’मध्ये काम करतात. तसेच रशियाच्या ‘जेनेटिक रिसर्च प्रोग्राम’चे नेतृत्वही करतात. त्यात त्या प्रमुख संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची धाकटी मुलगी २९ वर्षीय कॅटरिना दिखोनोव्हा रशियाच्या संरक्षण विभागाशी संलग्न आहेत. वर्ष २०१८ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराची धुरा कॅटरिना यांच्या खांद्यावर होती. त्याआधी त्यांच्या वडिलांसाठी त्या भाषणे लिहित असत.