खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी
सोलापूर – पर्यटन मंत्रालयाद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि आध्यात्मिक सुविधा संवर्धन राष्ट्रीय मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक विरासत संवर्धन म्हणजेच ‘प्रसाद योजने’अंतर्गत सोलापुरातील मंदिरांचा समावेश करावा, अशी मागणी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शून्य प्रहार काळात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच पर्यटनमंत्री यांच्याकडे सोलापुरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली आहे.
१. पर्यटन मंत्रालयाद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि आध्यात्मिक सुविधा संवर्धन राष्ट्रीय मिशनचा प्रारंभ ऑक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामीसमर्थ मंदिर, सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर मंदिर आणि तुळजापुरचे श्री तुळजाभवानी मंदिर या मंदिरांच्या विकासासाठी आणि यात्रेकरूंच्या सुविधेसाठी या प्रसाद योजनेअंतर्गत समावेश करण्यात यावा, असे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी म्हटले आहे.
(सौजन्य : Yes News Marathi)
२. सोलापूर जिल्हा हा आध्यात्मिक तीर्थस्थळांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु अद्याप सोलापुरातील एकही प्राचीन मंदिराचा समावेश या योजनेत नाही. त्यामुळे मंदिराच्या संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सोलापुरसह आसपासच्या परिसरातील प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी प्रसाद योजनेत समावेश करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली आहे.