कोल्हापूर, ४ एप्रिल (वार्ता.) – बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची, असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ३ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले
१. देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले आहे की, हिंदूंना हिंदु म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. हिंदु म्हणजे बुरसटलेले, असे देशात सातत्याने पुस्तकांद्वारे, तसेच शिक्षणातून आणि भाषणातून मांडले गेले. जातीय तेढ निर्माण होऊ नये, हे केवळ हिंदूंनी सांभाळले पाहिजे, असे झाले. सर्वधर्मसमभाव म्हणजे केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा; पण हिंदूंचा सन्मान करायचा नाही, असे चालणार नाही. तुम्ही आमच्या आरतीचा सन्मान करा, आम्ही तुमच्या अजानचा सन्मान करू.
२. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याचे भाषण हे सामान्य हिंदूंच्या मनाला सुखावणारे होते.
३. कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बँक खात्यात ‘पे.टी.एम्.’द्वारे पैसे पाठवले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कुणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठवणे हे ‘मनी लाँड्रिंग’ आहे. या प्रकरणी ‘ईडी’कडे तक्रार करणार असून अन्वेषणाची मागणी करणार आहे.
४. अबकारी कर खात्याच्या अधिकार्यांनी कोल्हापुरातील मद्य दुकानदारांची बैठक घेऊन काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणल्याचे समजते. काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. आम्ही सरकारी अधिकार्यांना याविषयी खडसावू.