सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी १८९ लढाया लढल्या. स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी ते अविरत लढले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांना १६ भाषा अवगत होत्या. धर्मासाठी शेवटपर्यंत लढणार्या छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास रंगवला गेला, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ इतिहासकार सु.ग. शेवडेगुरुजी यांनी केली. संपूर्ण १ मास पाळण्यात आलेल्या बलीदान मासाचा समारोप गांधी मैदान येथून मूकपदयात्रेने करण्यात आला. या वेळी सु.ग. शेवडेगुरुजी बोलत होते. ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
सु.ग. शेवडेगुरुजी म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणलाच गेला नाही. ज्या महिला जन्मालाच आल्या नव्हत्या, अशा महिला निर्माण करून त्यांच्याशी संभाजी महाराज यांचा संबंध जोडण्यात आला. त्यांना व्यसनी असल्याचे भासवण्यात आले.’’