मुंबई, २ एप्रिल (वार्ता.) – भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ६ ते १४ एप्रिल या कालावधीत देशभर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शहरात भाजपद्वारे नालेस्वच्छतेच्या कामांची पहाणी आणि देखरेख अभियान राबवून मुंबईकरांची सेवा करणार आहेत. मुंबई येथे १ सहस्र ५०० पेक्षांहून अधिक ठिकाणी या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे नेते आणि अधिवक्ता आशिष शेलार यांनी २९ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिन असून या निमित्ताने व्यापक कार्यक्रम देश पातळीवर हाती घेण्यात आला आहे. याच दिवशी मुंबई येथील प्रत्येक शक्ती केंद्रावर भाजपच्या वतीने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. भाजप हा देशातील सर्वांत मोठा सेवाकार्य करणारा पक्ष असून जमिनीवर काम करणारा, तसेच महाराष्ट्रात सर्वांत अधिक जनसमर्थन मिळालेला पक्ष आहे. ६ एप्रिल या दिवशी सकाळी ९.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप पक्ष कार्यकर्ते आणि जनतेला जाहीर संबोधित करणार आहेत.