सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणाऱ्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा संकल्प यांमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला पश्चिम महाराष्ट्र अन् गोवा येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली. गुरुदेवांची ज्ञानशक्ती आणि सद्गुरु स्वातीताईंचे लाभलेले मार्गदर्शन यांतून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी समाजातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक अन् हितचिंतक मोठ्या संख्येने अभियानात कृतीशील सहभाग घेत आहेत. ‘हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांची ज्ञानगंगा प्रवाहित होऊन सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली. १८.१२.२०२१ ते १९.१.२०२२ या कालावधीत ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला पुणे येथे मिळालेल्या प्रतिसादाविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. मिलिंद साठ्ये आणि डॉ. (सौ.) रोहिणी साठ्ये यांनी ग्रंथसूची पाहून ग्रंथांची मोठ्या प्रमाणात मागणी देणे
‘सातारा रस्ता (पुणे) येथील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. मिलिंद साठ्ये आणि डॉ. (सौ.) रोहिणी साठ्ये नियमितपणे सनातनचे ग्रंथ घेतात. त्यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी ग्रंथसूची मागितली. ‘सूचीतील जे ग्रंथ आमच्याकडे नाहीत, ते पाहून आम्ही ग्रंथांची मागणी करतो’, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथसूची पाहून ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची मोठ्या प्रमाणात मागणी दिली. ‘हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचले पाहिजे’, असे ते दोघेही म्हणाले. ‘या ग्रंथांचे एक ग्रंथालय करता येईल. त्यामुळे चिकित्सालयात येणारे लोक ग्रंथ वाचू शकतील’, असे डॉ. (सौ.) रोहिणी साठ्ये यांनी सांगितले.
२. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. जालिंदर तांबे यांनी त्यांच्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ नातेवाइकांना देण्यासाठी ‘दत्त’ लघुग्रंथ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामपट्ट्यांची मागणी करणे
सिंहगड रस्ता (पुणे) येथील श्री. जालिंदर तांबेकाका साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. ते विज्ञापन आणि अर्पण यांच्या माध्यमातून नियमितपणे सहकार्य करतात. साधकांनी त्यांना मकरसंक्रांतीनिमित्त संपर्क केल्यावर ‘ते हरिद्वार येथे यात्रेसाठी गेले आहेत’, असे समजले. ते प्रवासात असतांना साधकांचे त्यांच्याशी बोलणे झाले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘माझी आई अनेक दिवसांपासून रुग्णाईत होती. मी हरिद्वार येथील चंडीमातेला प्रार्थना केली होती, ‘माझ्या आईला त्रासातून मुक्त कर. सनातनच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’तून मला प्रार्थनेचे महत्त्व समजले. मी प्रार्थना केल्यानंतर एका घंट्यातच मला घरून भ्रमणभाष आला आणि आईचे निधन झाल्याचे समजले.’’ काका हे सांगत असतांना शांत आणि स्थिर होते. त्या वेळी साधकांनी त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करायला सांगितला. ‘आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ नातेवाइकांना देण्यासाठी त्यांनी ‘दत्त’ लघुग्रंथ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामपट्ट्या यांची मागणी केली.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक डॉ. आशिष पाटील यांनी ‘आयुर्वेद’ आणि ‘संस्कार’ यांविषयीचे ग्रंथ घेणे अन् त्यांच्या परिचित व्यक्तींचे संपर्क क्रमांक देणे
सिंहगड रस्ता येथील डॉ. आशिष पाटील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. ते नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’ला विज्ञापन देतात. त्यांना संपर्क केला असता त्यांनी ‘आयुर्वेद’ आणि ‘संस्कार’ यांविषयीचे ग्रंथ घेऊन वाचले. त्यांनी सांगितले, ‘‘या ग्रंथांत अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. या ग्रंथांत सांगितल्यानुसार आचरण केल्यास आपण खरोखरच निरोगी राहू शकतो. मी माझ्या परिचयातील काही जणांचे संपर्क क्रमांक तुम्हाला देतो. त्यांनाही हे ग्रंथ दाखवा.’’
४. ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’ला उपस्थित रहाणाऱ्या जिज्ञासूंचा लाभलेला प्रतिसाद !
४ अ. सौ. नयना पाटील यांनी ‘मूत्रवहनसंस्थेचे विकार’ आणि ‘रिफ्लेक्सॉलॉजी’ हे ग्रंथ घेणे : साधकांनी गावठाण येथील ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’ला उपस्थित रहाणाऱ्या जिज्ञासू सौ. नयना पाटील यांना ग्रंथसूची दाखवली. त्यांनी ‘मूत्रवहनसंस्थेचे विकार’ या ग्रंथाची मागणी केली. त्या म्हणाल्या, ‘‘देवाला ठाऊक होते की, मला या ग्रंथाची आवश्यकता आहे; म्हणून त्याने तुम्हाला पाठवले. या ग्रंथाचा मला लाभ होईल.’’ त्यांनी ‘हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)’ हा ग्रंथही घेतला.
४ आ. सौ. रेश्मा कुंभार यांनी सेवा म्हणून ग्रंथांचे वितरण करणे आणि ‘सेवेत पुष्कळ आनंद मिळाला’, असे सांगणे : कोथरूड येथील जिज्ञासू सौ. रेश्मा कुंभार ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’त स्वतःहून सहभागी झाल्या आणि त्यांनी ग्रंथांचे वितरण केले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना तळमळीने संपर्क केले. त्यांनी जिज्ञासूंना ‘नामजप, व्यष्टी साधना आणि सेवा’, यांचे महत्त्वही सांगितले. ‘त्यांना या सेवेत पुष्कळ आनंद मिळाला’, असे त्यांनी सांगितले.
५. हितचिंतक श्री. सुभाष पाटील यांनी मुलाच्या विवाहानिमित्त लघुग्रंथ भेट देणे
कोथरूड येथील हितचिंतक श्री. सुभाष पाटील यांना संपर्क केल्यावर ‘त्यांच्या मुलाचा विवाह आहे’, असे साधकांना कळले. त्या वेळी ‘नातेवाइकांना अहेर म्हणून ग्रंथ देऊ शकता का ?’, असे त्यांना विचारल्यावर त्यांनी ‘आपल्या गुरुबंधूंना (सनातन संस्थेच्या साधकांना) आपणच सहकार्य केले पाहिजे’, असे सांगून लघुग्रंथांची मागणी केली आणि विवाहाच्या वेळी लघुग्रंथ भेट दिले.
६. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका श्रीमती अलका निकम यांनी यजमानांच्या निधनानंतर नातेवाइकांना देण्यासाठी ‘धर्मशिक्षण फलक’ या ग्रंथाची मागणी देणे
सिंहगड रस्ता येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका श्रीमती अलका निकम यांच्या यजमानांचे निधन झाले. त्या वेळी त्यांची विचारपूस करतांना ‘तेराव्या दिवशी भेटायला येणाऱ्या लोकांना ग्रंथ देऊ शकता का ?’, असे साधकांनी विचारले. तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. त्या म्हणाल्या, ‘‘एरव्ही तेराव्या दिवशी आम्ही लोकांना तांब्याची लोटी इत्यादी देतो. आमच्या नातेवाइकांना सनातनच्या ग्रंथांतून उपयोगी माहिती मिळेल आणि मलाही समाधान मिळेल.’’ त्यांनी ‘धर्मशिक्षण फलक’ या ग्रंथांची मागणी दिली.
७. हितचिंतक श्री. श्याम झंवर यांनी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’साठी धनादेश देऊन त्या पैशांतून शाळांतील विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देण्यास सांगणे
कोथरूड येथील हितचिंतक श्री. श्याम झंवर हे सनदी लेखपाल (चार्टर्ड अकाऊंटंट) आहेत. त्यांना सनातन संस्थेचे कार्य आणि ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’चे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी त्वरित धनादेश दिला. त्यांनी सांगितले, ‘‘या पैशांतून शाळांतील विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट द्या.’’ त्यानुसार वारजे येथील ‘स्मिता पाटील विद्यामंदिर’ आणि ‘यशोदीप माध्यमिक विद्यालय’ या दोन शाळांमध्ये ‘बालसंस्कार’, ‘प्रथमोपचार’ आणि ‘धर्मशिक्षण’ यांविषयीचे ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आले. ‘विद्यार्थ्यांना या ग्रंथांचा चांगला लाभ होईल’, असे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले.’
– सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१९.१.२०२२)