एका शेतकरी महिलेच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला !

  • एका ठिकाणी रुळ तुटल्याचे पाहिल्यावर स्वत:ची लाल साडी फाडून रेल्वे चालकाला दिला धोक्याचा इशारा !
  • आजच्या काळात समाजाचा विचार करणारे लोक अभावानेच आढळतात. त्यामुळे या धाडसी महिलेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच ! मुळात रुळ तुटण्यासारखा हलगर्जीपणा होतोच कसा, हे शोधून संबंधित रेल्वे कर्मचारी अन् अधिकारी यांच्यावर कारवाई होणेही आवश्यक आहे !
शेतकरी महिला

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील एटा ते आगरा मार्गावर जाणार्‍या एका रेल्वेगाडीचा मोठा अपघात टळल्याची घटना नुकतीच घडली. एटा जिल्ह्यात असलेल्या अवागढ तालुक्यातील नगला गुलारिया गावाजवळ रेल्वेचा रुळ एका ठिकाणी तुटला होता. त्या गावातील सोमवती नावाच्या एका शेतकरी महिलेने शेताकडे चालत जात असतांना हे हेरले. लाल रंगाची साडी नेसलेल्या सोमवती यांनी समोरून रेल्वे येत असल्याचे पाहून स्वत:ची साडी फाडली आणि रुळाच्या मधोमध बांधली. तसेच हातवारे करून चालकाला धोक्याचा इशाराही दिला. चालकाने तो ओळखला आणि गाडी वेळीच थांबवली. एटा रेल्वेस्थानकावरून ही रेल्वेगाडी सकाळी साडेसात वाजता १५० प्रवाशांना घेऊन  आगर्‍याला रवाना झाली होती.