रा.स्व. संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंच आयोजित इफ्तार पार्ट्यांमध्ये स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आवाहन

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुसलमान कार्यकर्त्यांचे संघटन असलेल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने रमजान मासात देशभरात इफ्तार पार्ट्या (मेजवान्या) आयोजित करण्यात येणार आहेत. यापूर्वी या इफ्तार पार्ट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीने होत असल्या, तरी त्यामध्ये संघ स्वयंसेवक प्रत्यक्ष सहभागी होत नव्हते. या वर्षी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इफ्तार पार्ट्यांमध्ये स्वयंसेवकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे प्रवक्ते शाहीद सईद यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार त्यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच राष्ट्रीय मुस्लिम मंचाची बैठक झाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार

ईद मीलनाच्या कार्यक्रमासाठी रा.स्व. संघाच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करणार ! – शाहिद सईद

याविषयी माहिती देतांना शाहिद सईद म्हणाले, ‘‘संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या भागातील इफ्तार पार्टीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी इंद्रेश कुमार व्यक्तीगतरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय नेतृत्वाला आवाहन करणार आहेत. रमजाननंतर राष्ट्रीय मुस्लिम मंच आयोजित ईद मीलनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय मुस्लिम मंचाचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला. यासाठी भारत आणि विदेशांत सदस्य नोंदणी अभियान चालू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.’’