कर्नाटकातील हिंदूंच्या मंदिरांच्या परिसरात मुसलमान व्यापार्यांवरील बंदीचे प्रकरण
पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी मुसलमान व्यापार्यांच्या शिष्टमंडळाला सुनावले !
उडुपी (कर्नाटक) – शांतता आणि सद्भाव महत्त्वपूर्ण आहेच; मात्र केवळ एका समाजाकडून तो राखता येणार नाही. हिंदु समाजाने पूर्वीपासून पुष्कळ काही सहन केले आहे. काही घटनांमुळे हिंदूंना दुःख झाले आहे. काही धार्मिक नेत्यांमध्ये चर्चा करून ही समस्या सुटू शकत नाही. याचे समाधान मुळापर्यंत जाऊन शोधण्याची आवश्यकता आहे. जेव्हा एखाद्या समजावर वर्षानुवर्षे अन्याय होत असतो, तेव्हा त्याचा कधीतरी उद्रेक होतोच, अशा शब्दांत कर्नाटकातील पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी त्यांना भेटण्यास गेलेल्या मुसलमान व्यापार्यांच्या एका शिष्टमंडळाला सुनावले. कर्नाटकमध्ये काही मंदिरांनी त्यांच्या वार्षिक उत्सवाच्या वेळी मुसलमान दुकानदारांना मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची अनुमती नाकारली आहे. या सदंर्भात काही मुसलमान आणि ख्रिस्ती व्यापारी, तसेच धार्मिक नेते अन् व्यापारी यांच्या एका शिष्टमंडळाने विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. तेव्हा स्वामीजी यांनी उपरोक्त वक्तव्य केले. या शिष्टमंडळाने सांगितले की, धार्मिक उत्सवांच्या काळात साहित्यांची विक्री करून व्यापारी उपजीविका करत असतात. त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात व्यापार करण्याची अनुमती दिली जावी.
केवळ शांतता आणि सद्भाव यांची चर्चा पुरेशी नाही !
स्वामीजी पुढे म्हणाले की, एका विधवा महिलेच्या सर्व गायींची चोरी करण्यात आली. त्यामुळे तिच्याकडे उपजीविकेचा स्रोत राहिला नाही. त्यामुळे तिला रस्त्यावर यावे लागले. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या हिंदूंसाठी पुष्कळ दुःखदायक आहेत. आम्हीही अशा दुःखदायक घटनांतून गेलो आहोत. जर कुणी शांतता आणि सद्भाव यांची चर्चा करतो, तेव्हा ते पुरेसे नाही. तसेच शांततेत आणि सौहार्दपूर्ण जीवन जगण्यासाठी कोणत्याही तिसर्या व्यक्तीच्या मध्यस्थतेचीही आवश्यकता नाही.
(म्हणे) ‘१-२ लोकांमुळे संपूर्ण समाजाचा द्वेष करता येणार नाही !’ – उडुपी कंज्युमर फोरमचे मानद अध्यक्ष अबुबक्कर आत्राडी
उडुपी कंज्युमर फोरमचे मानद अध्यक्ष अबुबक्कर आत्राडी यांनी सांगितले, ‘केवळ १-२ लोकांमुळे संपूर्ण समाजाचा द्वेष करता येणार नाही. (जर समाजातील १-२ जण वाईट करत असतील, तर त्या समाजाने पुढे येऊन उघडपणे त्यांचा विरोध करून ते कसे चुकीचे आहेत, हे सांगितले पाहिजे. आज जगभरात जिहादी आतंकवाद चालू आहे; मात्र किती मुसलमान संघटना आणि मुसलमान नेते त्यांचा उघडपणे विरोध करून ‘ते इस्लामविरोधी आहेत’, असे सांगतात ? उलट भारतात तर जिहादी आतंकवाद्यांना ठार केल्यावर, त्यांना अटक केल्यावर ‘ते कसे निरपराध आहेत’, हेच सांगण्याचा प्रयत्न केला जातो. याविषयी अबुबक्कर का बोलत नाहीत ? – संपादक) आम्ही एकाच आईची मुले आहोत. माझे आवाहन आहे की, सर्वांना गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे.’ (टाळी एक हाताने कधीच वाजत नाही. हिंदू नेहमीच गुण्यागोविंदाने रहात आले आहेत; मात्र अन्य धर्मियांकडून नेहमीच हिंदूंवर आक्रमण, अत्याचार केला गेला आहे. हे अबुबक्कर यांना दिसत नाही का ? आता हिंदूंनी राज्यघटनेने केलेल्या कायद्याच्या आधारे निर्णय घेतल्यावर अबुबक्कर यांना या गोष्टी आठवू लागल्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)