१. एकाच दिवशी अनेक सेवा झाल्यामुळे पाठ दुखणे आणि ‘मी देवाला आवडत नसणार’, असा तीव्र नकारात्मक विचार मनात येणे
२६.४.२०२० या दिवशी सकाळपासून माझ्या अनेक सेवा चालू होत्या. आदल्या दिवशी ‘आश्रम स्वच्छता, स्वरक्षण प्रशिक्षण आणि व्यायाम’, असे सर्व एकाच दिवशी केल्याने माझी पाठ अतिशय दुखत होती. त्या वेळी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. ‘माझ्यामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहेत. ‘अपेक्षा करणे’ हा तीव्र अहंचा पैलू मी कसा घालवणार ? मी देवाला नक्कीच आवडत नसणार’, असे अनेक तीव्र नकारात्मक विचार मनात येऊन मला रडू येत होते.
२. पाठ दुखत असतांना ‘श्रीकृष्ण पाठ दाबून देत आहे’, असे जाणवणे, त्याला ‘तू पाठ दाबू नकोस’, असे विनवल्यावरही त्याने पाठ दाबणे चालूच ठेवणे आणि त्याच्या प्रेमळ स्पर्शाने झोप लागणे
माझी पाठ पुष्कळ दुखत असल्याने मी झोपले होते आणि रडत होते. त्या वेळी सूक्ष्मातून श्रीकृष्ण माझ्याजवळ आला आणि माझ्या पलंगाच्या बाजूला गुडघ्यावर बसून तो माझी पाठ दाबू लागला. मला त्याच्या हाताचा स्पर्शही जाणवत होता. मी त्याला म्हणाले, ‘श्रीकृष्णा, माझी पाठ दाबू नकोस’, तरीही तो माझ्या पाठीला मर्दन करतच होता. श्रीकृष्णाला ‘माझी पाठ दाबू नको रे’, अशी विनवणी करत असतांनाच मला झोप लागली. मी सायंकाळी ५ वाजता झोपले आणि ५.५५ वाजता मला जाग आली. तेव्हाही श्रीकृष्ण माझी पाठ दाबतच होता, म्हणजे जवळजवळ ५५ मिनिटे श्रीकृष्ण माझी पाठ दाबत होता !
३. श्रीकृष्णाने एका साधिकेच्या माध्यमातून मनातील ‘देवाला मी आवडत नाही’, हा विचार चुकीचा असल्याची जाणीव करून देणे
त्यानंतर मी उठले आणि उत्तरदायी साधिकेला एक सूत्र विचारायचे असल्याने तिच्याकडे गेले. तेव्हा तिने ‘श्रेया, तू मला पुष्कळ आवडतेस’, असे म्हणत लहान बाळाप्रमाणे माझा गालगुच्चा घेतला. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. या प्रसंगातून ‘देवाला मी आवडत नाही’, हा माझ्या मनात असलेला विचार चुकीचा असल्याचे देवाने माझ्या लक्षात आणून दिले.
४. श्रीकृष्णाकडे पाहून नामजप करतांना भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू येणे आणि तेव्हा ‘श्रीकृष्णाच्या डोळ्यांतूनही अश्रू येत आहेत’, असे जाणवणे
त्यानंतर रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत श्रीकृष्णाकडे पाहून नामजप करतांना माझी भावजागृती झाली. मी डोळे मिटून नामजप करत होते. थोड्या वेळाने मी डोळे उघडले. तेव्हा ‘श्रीकृष्णाचे चित्र जिवंत झाले आहे’, असे मला वाटले. श्रीकृष्णाकडे पाहून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत असतांना ‘श्रीकृष्णाच्या डोळ्यांतूनही तेवढेच अश्रू येत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा ‘भक्ताच्या डोळ्यांत पाणी आले, तर देवाच्याही डोळ्यांत पाणी येते’, असे उत्तरदायी साधिकेने सांगितलेले वाक्य आठवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
‘हे श्रीकृष्णा, तुझ्या चरणांच्या धुळीचा कणही होण्याची माझी पात्रता नसतांना तू मला जवळ घेतोस आणि माझ्यावर प्रीतीचा वर्षाव करतोस ! तुझ्या चरणी किती रे कृतज्ञता व्यक्त करू ? ‘मला अखंड तुझ्याजवळ, तुझ्या चरणांशी ठेव’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
– कु. श्रेया गुब्याड, सोलापूर (२६.४.२०२०)
|