कर्णावती (गुजरात) – गुजरात उच्च न्यायालयाने एका मृत व्यक्तीची मालमत्ता तिच्या मुलीकडे तात्काळ हस्तांतरित करून तिच्या कह्यात देण्याचा आदेश दिला आहे. त्या मुलीच्या प्रेमविवाहाला तिच्या नातेवाइकांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे तिचा तिच्या वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार संपत नाही. अशा प्रकरणात मालमत्तेवरील मुलीच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे, असा निकाल गुजरात उच्च न्यायालयाने दिला.
न्यायालयाने पुढे म्हटले की, प्रेमविवाह केल्यामुळे मुलीला दर्जेदार जीवन जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. प्रेमविवाहाच्या प्रकरणांत मालमत्तेवरील मुलीच्या अधिकारांचे रक्षण केले पाहिजे, अन्यथा जीवनसाथीची निवड करण्याचा तिचा घटनात्मक अधिकार तिला परिपूर्ण आणि दर्जेदार जीवन देऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
न्यायालयाने स्थानिक पोलीस आणि विधी सेवा प्राधिकरणाला या प्रकरणातील मुलीच्या नावावर तिच्या मृत वडिलांची मालकी असलेली दोन घरे, एक दुकान आणि एक शेतजमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया त्वरित हाती घेण्याचाही आदेश दिला. तिच्या आईचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे, तर वडील डिसेंबर २०२१ मध्ये वारले. त्यानंतर तिचे नातेवाइक तिला त्रास देत होते.