‘काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे !’

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सारवासारव

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात खोटेच दाखवण्यात आले असल्याचे केले होते विधान

जर हे केजरीवाल यांना ठाऊक होते, तर त्यांनी आधीच हे का सांगितले नाही आणि त्यांना ते काय साहाय्य करू शकत आहेत, हे का घोषित केले नाही ? असे प्रश्‍न उपस्थित होतात ! – संपादक

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी देहली – काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे, अशी सारवासारव देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी देहलीच्या विधानसभेत बोलतांना ‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर अत्याचार झाल्याचे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात खोटेच दाखवण्यात आले आहे’ असे आक्षेपार्ह विधान केले होते. हे बोलतांना ते हसतही होते. यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांवरून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी आता वरील प्रकारे सारवासारव केली आहे. ‘मी काश्मिरी हिंदूंवर नाही, तर भाजपवर हसत होतो,’ असेही सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केजरीवाल यांनी या मुलाखतीत केला. भाजपकडून विधानसभेत ‘देहलीत ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करावा’, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर केजरीवाल यांनी आपेक्षार्ह विधान केले होते.

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, काश्मिरी हिंदूंवर मोठा अन्याय झाला. ही एक मोठी शोकांतिका होती. काश्मिरी हिंदूंच्या पलायनाला ३२ वर्षे झाली आहेत. कोणत्याही संवेदनशील सरकारने त्यांना न्याय दिला असता. सरकारने त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करायला हवी होती. त्यांना तेथे भूमी देऊन धोरण बनवायला हवे होते. भाजपसाठी काश्मीरच्या फाइल्स महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी काश्मिरी हिंदू अधिक महत्त्वाचे आहेत. जेव्हा हिंदू काश्मीरमधून स्थलांतरित झाले, तेव्हा वर्ष १९९३ मध्ये देहलीतील २३३ कंत्राटी शिक्षक म्हणून देहली सरकारमध्ये सहभागी झाले होते. आमचे सरकार आल्यावर आम्ही २३३ शिक्षकांना कायम केले. एवढ्या वर्षांत काँग्रेसचे सरकार होते; पण त्यांच्यासाठी काही केले नाही. या हंगामी शिक्षकांना आम्ही कायम केले. आम्ही त्याच्यावर चित्रपट बनवला नाही.