काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यासह ६ जणांना ११ वर्षांनंतर १ वर्ष कारावास !

वर्ष २०११ मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे प्रकरण

  • ११ वर्षांनंतर मिळणारा न्याय ‘हा न्याय नसून अन्यायच होत’, असेच जनतेला वाटते ! – संपादक
  • गावगुंडांप्रमाणे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे काँग्रेसवाले इतर वेळेला मात्र गांधींच्या अहिंसेविषयी बोलत असतात. त्यांचा गांधीवाद किती बेगडी आहे, हे या घटनेवरून दिसून येते ! – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्यासह ६ जणांना वर्ष २०११ मधील उज्जैन येथील एका मारहाण प्रकरणात प्रत्येकी एक वर्ष कारावास अन् ५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इंदूर येथील विशेष न्यायालयाने ११ वर्षांनंतर २६ मार्च या दिवशी हा निर्णय दिला. आरोपींनी प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंड भरल्यानंतर प्रत्येकी २५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन संमत करण्यात आला आहे. ‘सर्व आरोपींना सुनावण्यात आलेली शिक्षा ३ वर्षांपेक्षा अल्प असल्याने त्यांना जामीन मिळाला’, असे सरकारी अधिवक्ता विमलकुमार मिश्रा यांनी सांगितले. दिग्विजय सिंह आणि गुड्डू हे शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

१७ जुलै २०११ या दिवशी भाजप युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंह यांना काळे झेंडे दाखवले होते. दिग्विजय सिंह यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली गेली होती. यावेळी दिग्विजय सिंह आणि माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्या समक्षच काँग्रेस अन् भाजयुमो यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद भडकला होता. त्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन भाजयुमोचे कार्यकर्ते रितेश खाबिया यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.