पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ६ दिवसांत पाचव्यांदा वाढ !

नवी देहली – देशात इंधनाचा भडका चालूच आहे. मागील ६ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात पाचव्यांदा वाढ झाली आहे. २७ मार्च या दिवशी पेट्रोल ५० पैशांनी, तर डिझेल ५५ पैशांनी महाग झाले. एकूण ६ दिवसांत ३ रुपये ७५ पैशांपर्यंत इंधन दरवाढ झाली आहे. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोल ११३ रुपये ८५ पैसे झाले असून डिझेलचा प्रतिलिटर दर ९८ रुपये १० पैसे झाला आहे. देहलीत हाच दर अनुक्रमे ९९ रुपये ११ पैसे आणि ९० रुपये ४२ पैसे झाला.

रशिया-युक्रेन युद्धाचा इंधन दरवाढीवर असा झाला परिणाम !

अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यानंतर रशिया हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू असल्याने निर्यात केलेल्या कच्च्या तेलापैकी ६५ टक्के तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येत नाही. त्यामुळे जगात तेलाचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पेट्रोल, डिझेल, तसेच गॅसच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. २४ फेब्रुवारीला युद्ध चालू झाल्यापासून कच्च्या तेलाची किंमत वाढत गेली. ७ मार्च या दिवशी त्याचा दर प्रति बॅरल ९० डॉलरवरून वाढून १४० डॉलरपर्यंत पोचला होता. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२० डॉलरच्या जवळ आहे.