वाहतूक पोलीस जनतेकडून करत असलेल्या पैसे वसुलीची गृहविभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी !

  • वाहतूक पोलिसांकडून जनतेच्या होणार्‍या लुबाडणुकीचा प्रश्न विधानसभेत गाजला !

  • तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांचा आदेश

पोलिसी मनोवृत्तीची चुणूक !

तालिका अध्यक्ष संजय शिरसाट

मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – विविध शहरांमध्ये चौकाचौकात वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी जनतेकडून बळजोरीने पैशाची वसुली करत आहेत. या गोष्टीला वाहतूक पोलीस नव्हे, तर पोलीस निरीक्षक किंवा तेथील विभागाचे पोलीस अधिकारी उत्तरदायी आहेत. पोलिसांचे स्थानांतर करण्यासाठी दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकार केले जातात, अशा शब्दांत विधानसभेचे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विधानसभेत अप्रसन्नता व्यक्त करून गृहविभागाने याची गांभीर्याने नोंद घेण्याचा आदेश दिला. तालिका अध्यक्षांनी असा आदेश दिल्याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न प्रश्नोत्तरात २५ मार्च या दिवशी उपस्थित केला होता. आमदार प्रकाश अबिटकर, आशिष जयस्वाल, देवयानी फरांदे, समीर कुणावार या आमदारांनी वाहतूक पोलिसांकडून जनतेला दिल्या जाणार्‍या त्रासाविषयी तीव्र शब्दांत अप्रसन्नता व्यक्त केली. ‘वाहतूक नियमन करण्याऐवजी हे ‘पांढरे बगळे’ चौकाचौकात हप्तावसुली करतात’, अशी टीका अबिटकर यांनी केली, तर वाहतूक विभागाचे पोलीस आम्हाला ‘लाखो रुपयांचे लक्ष्य आहे’, असे सांगतात याकडे आमदार समीर कुणावार यांनी लक्ष वेधले.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, विनाशिरस्त्राण दुचाकीचालकांकडून वसूल केला गेलेला दंड नियमानुसारच आहे आणि तो सरकारी तिजोरीतच जमा केला जातो. आमदारांनी स्पष्ट तक्रारी दिल्या, तर कारवाई करू. त्यावर तालिका अध्यक्ष शिरसाट म्हणाले की, चौकात पैसे वसूल करणारा वाहतूक पोलीस छोटा असतो; पण त्याच्या डोक्यावरचे (वरिष्ठ) पोलीस निरीक्षक किंवा सर्कल अधिकारी यांच्याकडे आपण पहात नाही. स्थानांतर कसे होते, हे ठाऊक आहे आणि पैसे देतो, तो वसूल करतो, हे मी उत्तरदायीपणाने सांगतो. गडचिरोली येथे एका मोहिमेत मर्दुमकी बजावलेल्या पोलिसाला नवी मुंबईत स्थानांतर हवे होते आणि त्या ठिकाणी जागा रिक्त होती; पण ती दुसर्‍याच कुणाला तरी दिली गेली. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. (विधानसभेत तालिका अध्यक्षांनीच त्यांच्यासमवेत वाहतूक पोलिसांचे आलेले वाईट अनुभव सांगणे हे पोलीसयंत्रणेला लज्जास्पद आहे. लोकप्रतिनिधींना पोलिसांचे वाईट अनुभव येत असतील, तर असे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, याचा विचार न केलेला बरा ! – संपादक)