‘रशिया टूडे’ या रशिया सरकारच्या मुखपत्राने विशेष लेखाद्वारे केले भारताचे कौतुक !
मॉस्को (रशिया) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाच्या युक्रेनमधील सैनिकी कारवाईला विरोध दर्शवणार्या पाश्चात्त्य देशांच्या ठरावाच्या मतदानात भारताने भाग न घेता तो तटस्थ राहिला. यावर रशिया सरकारचे मुखपत्र ‘रशिया टूडे’ने भारताचे कौतुक करणारा विशेष लेख प्रकाशित केला आहे. ‘रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन एक मास उलटला असला आणि भारतावर पाश्चात्त्य देश अन् विशेषकरून अमेरिका यांच्याकडून रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचा दबाव आणला जात असला, तरी भारत याला जुमानत नाही. भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर विशेष विपरीत परिणाम होणार नाहीत’, असे या लेखात म्हटले आहे.
‘भारताच्या दृष्टीकोनातून ‘युक्रेनी संकट’ आणि एकीकडे रशियाशी अन् दुसरीकडे पाश्चात्त्य जगताशी असलेले त्याचे संबंध !’ या मथळ्याखाली ‘वैशिष्ट्यपूर्ण’ (फीचर्ड) या भागामध्ये हा लेख ‘रशिया टूडे’ने प्रकाशित केला आहे.
यात पुढे म्हटले आहे की,
१. भारताने युक्रेनमधील त्याच्या सहस्रावधी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियन सरकार आणि रशियन सैन्य यांच्यासमवेत जो समन्वय केला, तो वैशिष्ट्यपूर्ण होता. भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांच्या विधानाचा उल्लेख करून ‘भारताला या युद्धाशी विशेष देणे-घेणे नसून त्यांना त्यांच्या नागरिकांचा जीव अधिक महत्त्वाचा वाटला’, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे.
२. रशियाचे चीनवरील वाढते परावलंबित्व दूर होण्यासाठी भारताने प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारताने या दृष्टीकोनातून निर्णायक भूमिका घेऊन नवीन उद्योगांची निर्मिती करणे, रशिया आणि भारत यांचे संयुक्त प्रकल्प चालू करणे आणि गुंतवणूक वाढवणे, यांसाठी प्रयत्न करावेत. तरच उभय देशांतील संबंध अधिक सुदृढ होतील.
३. सध्या रशियाला पाश्चात्त्य शक्तींच्या तुलनेत जगातील अन्य देशांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावे लागतील. पूर्वेकडील देशांशी अधिक चांगले संबंध निर्माण करण्याचा लाभ मिळवण्यासाठी भारताने रशियासमवेत रहाण्याची आवश्यकता आहे.
४. सद्य:स्थिती पहाता पुढे काय होईल, हे रशियालाही ठाऊक नाही; परंतु भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये जी (रशियाला पूरक) भूमिका घेतली, त्यावर रशियाने समाधान मानायला हवे. जागतिक स्तरावर होत असलेली राजकीय उलथापालथ पहाता रशिया आणि भारत यांनी आता द्विपक्षीय संबंधांकडे वेगळ्या दृष्टीने पहाणे आवश्यक आहे. उभय देशांच्या नेतृत्वाची इच्छाशक्ती आणि दोन्हींकडील व्यावसायिकांचे प्रोत्साहनात्मक कार्य यावर भविष्य अवलबूंन असेल, असे या लेखात शेवटी सांगण्यात आले आहे.