शिवजयंतीच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्नरत असणार्या हुकमिल लेन (मुंबई) येथील श्री शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! सर्व उत्सव मंडळांनी यातून बोध घ्यावा ! – संपादक
मुंबई – एन्.एम्. जोशी मार्ग, हुकमिल लेन येथील श्री शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च) या दिवशी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. इतिहास अभ्यासक आणि श्री शिवजयंती उत्सव समितीचे सचिव श्री. राजेंद्र सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित या शिवजयंती उत्सवात स्थानिक शिवप्रेमींनी उत्साहाने भाग घेतला.
२० मार्च या दिवशी सकाळी बालगोपाळांसाठी सूर्यनमस्कार, जोर, बैठका अशी शक्ती उपासनेची स्पर्धा आणि सायंकाळी शिवचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे २१ मार्च या दिवशी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची छोटी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता माता-भगिनी यांनी बालशिवबाचा पाळणा म्हटला. त्यानंतर शिवचरित्रावर आधारित वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी श्री. राजेंद्र सावंत यांनी शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.
शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. गोपाळराव खाड्ये यांच्या हस्ते पारितोषिक वितरण !
स्पर्धा परीक्षेतील विजेत्या स्पर्धकांना शिवसेनेच्या करीरोड येथील शाखाप्रमुख श्री. गोपाळराव खाड्ये यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ पार पडला. या उत्सवात परिसरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ उत्साहाने सहभागी झाले होते. श्री शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ बने, सदस्य सर्वश्री आनंदराव पाटील, शैलेश रेडेकर, सौ. शुभांगी कुराडे, श्रीमती शोभा ढमाले यासंह स्थानिक शिवप्रेमी यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.