कोटा, राजस्थान येथे एक मासासाठी जमावबंदी लागू

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रक्षेपणाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

कोटा (राजस्थान) – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रक्षेपणाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटा, राजस्थान येथे २२ मार्च ते २१ एप्रिल २०२२ यो एका मासासाठी जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. महावीर जयंती, ‘गुड फ्रायडे’ इत्यादी  सण, तसेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पहाण्यासाठी लोटणारी गर्दी यांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे.

‘महिला चंडी मार्च’ला घाबरूनच सरकारचा जमावबंदी आदेश ! – भाजप

भाजपचे उत्तर कोटा येथील माजी आमदार प्रल्हाद गुंजल यांनी जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयावर एक निवेदन प्रसिद्ध केले. यात त्यांनी म्हटले आहे, ‘राजस्थानमधील काँग्रेसच्या एका मंत्र्याने महिलांविषयी केलेल्या विधानाच्या विरोधात ‘महिला चंडी मार्च’ काढण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने कोटामध्ये जमावबंदी लागू केली आहे; परंतु त्याने काहीही फरक पडणार नाही.’