गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपकडून पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांची निवड : राज्यपालांकडे केला सरकार स्थापनेचा दावा

पणजी, २१ मार्च (वार्ता.) – भाजपने गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी डॉ. प्रमोद सावंत यांची निवड झाल्याची घोषणा २१ मार्च या दिवशी सायंकाळी केली. यामुळे ‘भावी मुख्यमंत्री कोण ?’ याविषयी राज्यातील गेले काही दिवस चाललेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. यानंतर भाजप सायंकाळी उशिरापर्यंत राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. १० मार्च या दिवशी निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी भाजपने मुख्यमंत्री पदासाठी निवड केली आहे.

भाजप विधीमंडळ नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंदीय राज्यमंत्री एल्. मुरुगन हे २१ मार्च या दिवशी सकाळी गोव्यात आले. यानंतर केंद्रीय निरीक्षक, पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि गोवा प्रभारी सी.टी. रवि यांच्या उपस्थितीत विधीमंडळ गटाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव आमदार विश्वजीत राणे यांनी सूचित केले आणि पक्षाच्या इतर आमदारांनी त्याला बिनविरोध पाठिंबा दिला.’’