अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास आपण पहात आहोत. १९ मार्च २०२२ या दिवशीच्या अंकात आपण त्यांचे नोकरी करत असतांनाचे जीवन आणि वैवाहिक जीवन यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

बसलेले डावीकडून पू. अशोक पात्रीकर आणि सौ. शुभांगी पात्रीकर
मागे उभे असलेले डावीकडून कु. तेजल पात्रीकर,
श्री. निखिल पात्रीकर, श्री. शशांक जोशी आणि सौ. अनघा शशांक जोशी

 

सौ. नमिता निखिल पात्रीकर

४. वय ४७ ते ७२ वर्षे

४ अ. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ

४ अ १. परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांनी घरी येऊन साधनेविषयी सांगणे आणि त्यांनी नामजपाच्या संदर्भात सांगितल्यावर कुलदेवाचा जप अधिकाधिक करू लागणे : मी नोकरीच्या काळात यवतमाळ येथे असतांना वर्ष १९९७ मध्ये माझा सनातन संस्थेशी संपर्क आला. त्या वेळी मी रहात होतो, त्या बालाजी वसाहतीच्या भागातच परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाकांचे घर होते. माझ्या पत्नीच्या आग्रहामुळे ते आमच्या घरी येऊन मला साधनेविषयी सांगत. मी त्यांचे बोलणे ऐकून घेत असे; मात्र त्याप्रमाणे कृती करत नसे. ते मला ‘कुलदेवतेचा नामजप करा. नामजपाला स्थळ, काळ आणि वेळ यांचे बंधन नाही. बसमधून येता-जाता जप केला, तरी तुमची साधना होणार’, असे सांगत. तोपर्यंत मला ‘देवाचे काही करायचे, तर देवासमोर बसायलाच हवे’, असे वाटत असे. त्यामुळे सनातन संस्थेने सांगितलेली ही गोष्ट मला वैशिष्ट्यपूर्ण वाटली. त्यांनी कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व सांगितल्यावर ‘आमचे कुलदैवत श्रीराम आहे’, हे ठाऊक असल्याने मी ‘श्रीरामाय नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न केला.

४ अ २. एका नातेवाइकाने ‘पात्रीकरांची कुलदेवता ‘रेणुकादेवी’ आहे’, असे सांगणे आणि त्यानंतर सनातनच्या साधकांनी सांगितल्याप्रमाणे कुलदेवतेच्या दर्शनासाठी माहूरला जाणे : साधनेत आल्यावर ‘आपली कुलदेवताही असावी’, असे माझ्या पत्नीला वाटत असे. त्यानुसार तिने माझ्या आईला त्याविषयी विचारले; पण तिला ते ठाऊक नव्हते. माझे एक नातेवाईक आईला प्रथमच भेटायला आले होते. पत्नीने त्यांना कुलदेवतेविषयी विचारले. तेव्हा त्यांनी ‘पात्रीकरांची कुलदेवता ‘रेणुकादेवी’ आहे’, असे सांगितले. त्या वेळी आम्हा सर्वांना पुष्कळ आनंद झाला आणि आमचा अध्यात्मावरील विश्वास वाढला. त्यानंतर सनातनच्या साधकांनी सांगितल्यानुसार आम्ही कुलदेवतेच्या दर्शनासाठी माहूरला जाऊन आलो. त्या पूर्वी साधनेत नसतांना एकदा माझे आई-वडील यवतमाळला आले असतांना आम्ही त्यांना घेऊन माहूरला गेलो होतो; पण तेव्हा ‘हीच आमची कुलदेवता आहे’, हे आम्हाला ठाऊक नव्हते. त्यानंतर निखिलचा (मुलाचा) विवाह झाल्यावर त्याच्या पत्नीसह (सौ. नमिता निखिल पात्रीकर हिच्यासह) आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो.

४ अ ३. पत्नी आणि मुली यांनी सनातनच्या सत्संगाला जाणे; पण नोकरीतील व्यस्ततेमुळे सत्संगाला जायला मिळत नसणे : आमच्या शेजारच्या घरात सनातनचा साप्ताहिक सत्संग होत असे. त्या सत्संगाला माझी पत्नी सौ. शुभांगी, मुली कु. तेजल (कु. तेजल पात्रीकर, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि कु. मीनल (आताच्या सौ. अनघा शशांक जोशी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) जात असत. ‘मीही सत्संगाला यावे’, असा पत्नीचा आग्रह असायचा; पण नोकरीमुळे मला ते शक्य होत नसे.

४ अ ४. ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हा ग्रंथ अन् साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वाचन करणे : माझ्या पत्नीने सनातनचा ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हा ग्रंथ विकत घेऊन मला वाचायला दिला. त्याच वेळी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले होते. मी वेळ मिळेल, तसे त्याचे वाचन करत असे. ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे’, हा एक सत्संग होता’, हे मला नंतर कळले.

४ अ ५. यवतमाळहून अमरावती येथे स्थानांतर झाल्यावर बाहेरगावी जाऊन काम करण्याऐवजी कार्यालयीन कामकाज करण्याचा प्रस्ताव नकळत स्वीकारला जाणे आणि त्यामुळे ठराविक वेळी काम अन् उर्वरित वेळी साधना करता येणे : वर्ष १९९८ मध्ये यवतमाळ येथील माझ्या नोकरीचा ८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे माझे स्थानांतर (बदली) होणे क्रमप्राप्त होते. यवतमाळ येथे असतांना माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी (कार्यकारी अभियंत्यांनी) माझ्याकडून एक नाविन्यपूर्ण बांधकाम करवून घेतले होते. तशाच पद्धतीचे बांधकाम अमरावती जिल्ह्यात एका ठिकाणी करायचे निश्चित झाले. तेच वरिष्ठ अधिकारी अमरावती येथे ‘अधीक्षक अभियंता’ या पदावर रुजू झाल्याने त्यांनी ‘माझे स्थानांतर तेथे व्हावे’, असे वरिष्ठांना (मुख्य अभियंत्यांना) सांगितले. त्यानुसार माझे स्थानांतर अमरावती येथे त्यांच्या कार्यालयात करण्याचे ठरले. त्या कामासाठी पुन्हा मला बाहेरगावी जावे लागले असते. मला काम करायची आवड असल्याने मी त्यांचा निर्णय आनंदाने स्वीकारला. अकस्मात् अमरावती येथील मुख्य अभियंत्यांनी ‘त्यांच्या कार्यालयातील काम मी करावे’, असा प्रस्ताव मांडला. ‘या प्रस्तावाचा स्वीकार करायचा कि नाही ?’, हा निर्णय त्यांनी माझ्यावरच सोपवला. मी त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी माझी स्वीकृती विचारली आणि त्या क्षणी देवाने माझ्या मुखातून ‘होकार’ वदवून घेतला. हाच तो कलाटणीचा क्षण होता. त्या क्षणी मी नकार दिला असता, तर मी साधनेत येऊ शकलो नसतो. ‘मला साधनेत आणण्यासाठी देवाने हे सर्व घडवले’, हे माझ्या आता लक्षात येते. त्यासाठी मी देवाच्या, म्हणजेच परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे. या कार्यालयात मी केवळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत उपस्थित रहाणे अपेक्षित होते. त्यामुळे उर्वरित वेळ मी साधनेसाठी देऊ शकलो.

४ आ. सेवेचा आरंभ आणि केलेल्या विविध सेवा

४ आ १. आरंभी कुटुंबातील सदस्यांना साहाय्य करता करता स्वतःही विविध सेवा करू लागणे आणि प्रत्येक सेवा करतांना अनुभूती आल्याने अध्यात्माकडील कल वाढणे : आरंभी ‘कुटुंबातील सदस्यांना सत्संगासाठी दुचाकीने पोचवणे आणि आणणे’, असे मी करायचो. नंतर मी स्वतः सत्संगाला जाऊ लागलो. असे करत करत मला जिल्ह्याच्या ग्रंथसाठ्याची सेवा मिळाली. आरंभी उत्तरदायी साधकांनी मला या सेवेविषयी विचारल्यावर मी त्यांना ‘नंतर सांगतो’, असे सांगितले. नंतर पत्नी आणि मुली यांनी मला सांगितले, ‘‘अध्यात्मात कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नसते. तुम्ही ‘हो’ म्हणा. जेव्हा गुरु एखादी सेवा करायला सांगतात, तेव्हा ते ती सेवा करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि शक्तीही देतात. आम्ही तुम्हाला साहाय्य करू.’’ तेव्हा देवाने माझ्याकडून ‘हो’ म्हणवून घेतले. या काळात मी ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, साप्ताहिकाच्या अंकांचे वितरण करणे, तसेच ग्रंथप्रदर्शन लावणे’ इत्यादी सेवाही करत होतो. याच कालावधीत संस्थेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात लहान सभांचे आयोजन करण्यात येत होते. मला या सभांच्या ठिकाणी ग्रंथसाठा देण्याची सेवा करण्याची संधी मिळाली. ही सेवाही मी आनंदाने स्वीकारली. प्रत्येक सेवा करतांना मला अनुभूती येत होत्या आणि देवाच्या कृपेने हळूहळू माझा अध्यात्माकडील कल वाढत होता. वर्ष १९९८ मध्ये माझे स्थानांतर (बदली) अमरावती येथे झाले. त्यानंतर माझ्या साधनेला गती मिळत गेली.

४ आ २. प्रवचने, सत्संग आणि भाववृद्धी सत्संग घेण्याची सेवा करणे : मला लोकांसमोर बोलायची सवय नव्हती. साधनेत आल्यावर उत्तरदायी साधकांनी मला ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या प्रवचनातील काही भाग जिज्ञासूंसमोर मांडायला सांगितला आणि गुरुकृपेने मी तो विषय मांडला. त्यानंतर कधी कधी मी सत्संग घेत होतो. परात्पर गुरु देशपांडेकाकांनी मला भाववृद्धी सत्संग घ्यायला सांगितला. गुरुकृपेने तोही मला घेता आला.
४ आ ३. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर मुंबई आणि मिरज येथे राहून दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणे : वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले आणि त्याची विदर्भ आवृत्ती चालू करण्याचेही निश्चित झाले. या सेवेसाठी विदर्भातील साधकांना विचारणा होत होती. मला चारचाकी वाहन चालवायला पुष्कळ आवडत असे. त्यामुळे मी ‘वाहनचालक’ या सेवेसाठी माझे नाव दिले. नंतर मला संपादकीय विभागात सेवा करण्यासाठी विचारल्यावर मी त्यालाही होकार दिला. मुंबई येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या आवृत्तीची सिद्धता चालू असतांना मला मुंबईला प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. तिथे ४ मास सेवा केल्यानंतर मी काही दिवस अमरावतीला जाऊन आलो. नंतर मला मिरज येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली.

४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीची ओढ वाटणे : श्री. प्रकाश जोशीकाका विदर्भात प्रसारासाठी यायचे आणि कधी कधी अमरावतीला आमच्या घरी थांबायचे. त्यांच्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांविषयीची सूत्रे ऐकतांना मला पुष्कळ आनंद व्हायचा आणि ‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीला कधी जाणार ?’, असे मला वाटायचे.

४ ई. साधनेत आल्यावर त्याग आणि काटकसर यांचे महत्त्व कळल्याने मुलाची मुंज कारंजा येथील दत्ताच्या मंदिरात जाऊन साधेपणाने करणे : साधनेत आल्यावर त्याग आणि काटकसर यांचे महत्त्व कळल्याने निखिलची (मुलाची) मुंज आम्ही कारंजा (जिल्हा वाशिम) येथील दत्ताच्या मंदिरात जाऊन साधेपणाने केली आणि काही रक्कम गुरुचरणी अर्पण केली. त्या वेळी ‘सर्व बहिणींना बोलवावे’, अशी आईची इच्छा होती; पण मी तिचा विरोध पत्करून देवालयात मुंज केली.

४ उ. एकदा ‘ऐसी माझी भक्ती देवा…’ हे भजन म्हणणे आणि ‘आजही या भजनाप्रमाणेच आपली स्थिती आहे’, असे वाटणे : लहानपणापासून मला भजने गुणगुणायला आवडायची. साधनेत आल्यावर एकदा साधकांनी मला कोजागिरीच्या कार्यक्रमात भजन म्हणायला सांगितले. तेव्हा मी ‘ऐसी माझी भक्ती देवा…’ हे प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन म्हटले होते. हे भजन मला अद्यापही आवडते आणि असे वाटते, ‘या भजनातील प्रत्येक कडव्यात वर्णन केल्याप्रमाणे आजही माझी स्थिती आहे.’

४ ऊ. गोवा येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मिळालेला अनमोल सत्संग !

४ ऊ १. गोवा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळणे आणि लिखाण पडताळतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी व्याकरणाच्या किंवा वाक्यरचनेच्या चुका एका क्षणात दाखवणे : ‘वर्ष १९९९ च्या शेवटी मी मिरज येथे असतांना मला गोवा येथील ‘सुखसागर’ येथे असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. दोन मास मी गोवा येथील दैनिक कार्यालयात सेवा केली. त्या वेळी मला प्रतिदिन दैनिकाच्या पृष्ठ ३ चे लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांकडून पडताळून घेण्याची सेवा मिळाली होती. एकदा परात्पर गुरु डॉक्टर अन्य सेवांमध्ये व्यस्त होते; म्हणून मी त्यांना पृष्ठ ३ वरील वृत्ते दाखवायला उशीर केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी कितीही व्यस्त असलो, तरी दैनिकाची पाने पडताळून घ्यायला तुम्ही केव्हाही येत जा.’’ दैनिकाच्या पानावरील लिखाण पडताळतांना माझ्याकडून झालेल्या व्याकरणाच्या किंवा वाक्यरचनेच्या चुका परात्पर गुरु डॉक्टर एका क्षणात दाखवत असत. तेथे प्रत्येक गुरुवारी परात्पर गुरु डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई सर्व साधकांचा स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घ्यायचे. त्यात परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या चुका सांगायचे, तसेच चांगली सेवा करणार्‍यांचे कौतुकही करायचे. मला मात्र माझ्यातील स्वभावदोषांमुळे ‘सत्संगात माझ्या चुका सांगतील का ?’, अशी भीती वाटायची.

४ ऊ २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कक्षासमोर बसणार्‍या एका साधिकेने पटलावर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ठेवणे आणि त्यांचे अनेक वेळा दर्शन होत असूनही साधिकेच्या या कृतीमागील कारण न कळणे : ‘सुखसागर’ येथे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कक्षासमोर एक साधिका बसायच्या. त्यांच्या पटलावर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ठेवले होते. त्या प्रतिदिन छायाचित्राला ताजे फूल वहायच्या. तेव्हा मला आश्चर्य वाटायचे, ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा कक्ष मागेच आहे. त्यांचे अनेक वेळा दर्शनही होते, तरी या छायाचित्र का ठेवतात ?’ त्या वेळी मला भाव इत्यादी काहीच ठाऊक नव्हते; पण माझ्यातील ‘शिकण्याच्या वृत्तीचा अभाव’ या स्वभावदोषामुळे मी त्यांना तसे करण्यामागील कारण विचारले नाही.

४ ऊ ३. कुणालाही न विचारता उच्च रक्तदाबाची गोळी घेणे बंद केल्याने त्याचा परिणाम प्रकृतीवर होणे आणि आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांनी सांगितल्यावर पुन्हा गोळी घेण्यास आरंभ करणे : मला ‘उच्च रक्तदाब’ हा विकार आहे आणि त्यासाठी मला प्रतिदिन एक गोळी घ्यावी लागते. गोवा येथे असतांना माझ्या मनात अहंयुक्त विचार आला, ‘आपण आता साधना करतो. आता गोळी घ्यायची आवश्यकता नाही’; म्हणून मी कुणालाही न विचारता गोळी घेणे बंद केले. त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर झाला. आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांच्या ते लक्षात आले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमची साधना तुमच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी न वापरता ते कार्य त्या गोळीला करू द्या; कारण हा विकार तुम्हाला आधीपासून आहे.’’ नंतर मी पुन्हा गोळी घ्यायला आरंभ केला.

४ ऊ ४. परात्पर गुरु डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती ! : मी ‘टॅ्रक्स’ हे चारचाकी वाहन घेऊन गोव्याहून अमरावतीला जायला निघणार होतो. ‘त्या वेळी विदर्भातील दैनिक ‘सनातन प्रभात’ अमरावती येथून प्रकाशित होणार’, असे ठरले होते. दैनिक कार्यालयासाठी लोखंडी मांडण्या आणि काही लाकडी साहित्य न्यायचे होते. ते साहित्य निवडतांना परात्पर गुरु डॉक्टर स्वतः तेथे आले आणि त्यांनी ‘काय काय आवश्यक आहे ?’, हे दाखवून ते साहित्य वाहनात भरायला सांगितले. विदर्भात पिकलेले फणस मिळत नाहीत; म्हणून त्यांनी विदर्भातील जिल्ह्यांतील साधकांसाठीच नव्हे, तर मार्गातील सांगली, पुणे, संभाजीनगर येथील साधकांसाठीही पिकलेले फणस न्यायला सांगितले होते, तसेच त्यांनी या सर्व जिल्ह्यांतील साधकांसाठी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून आंबे द्यायला सांगितले. या प्रसंगांतून परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवरील प्रीती अनुभवायला मिळाली.

४ ए. पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेणे

४ ए १. स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाला कुटुंबियांनी पाठिंबा देणे : या कालावधीत मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. ‘महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या कु. तेजल आणि मीनल अन् ७ वर्षांचा निखिल यांचे दायित्व आणि निवृत्तीवेतनाविना अन्य आर्थिक स्रोत नाही’, अशा अवस्थेतही घरचे सर्व सदस्य साधनेत असल्याने मला कुणाकडूनही विरोध झाला नाही. आईचा थोडा विरोध होता; पण मी निर्णय घेतल्यावर तिने काही म्हटले नाही.

४ ए २. स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेणे; परंतु पदोन्नती सूचीत नाव असल्याने ‘हा निर्णय मागे घ्यावा’, असा आग्रह वरिष्ठांनी करणे आणि गुरुकृपेने या निर्णयावर ठाम रहाता येणे : कुटुंबियांच्या सहमतीने वर्ष १९९९ च्या शेवटी मी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे पत्र कार्यालयात दिल्यानंतर माझे नाव पदोन्नती सूचीत असल्याचे मला सांगण्यात आले. ‘मी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा’, असा आग्रह माझ्या वरिष्ठ आणि सहकारी अभियंत्यांनी केला; पण गुरूंच्या कृपेने मला माझ्या निर्णयावर ठाम रहाता आले.

४ ए ३. कार्यालयातील सहकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे शेष असलेली सुटी घेऊन तो वेळ सेवेसाठी देणे : स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर माझी ७ – ८ मासांची अर्जित आणि वैद्यकीय सुटी शेष होती. कार्यालयातील सहकार्‍यांनी मला ती उपभोगण्यास सांिगतले; कारण ती न घेण्याचा काहीच लाभ होणार नव्हता. त्यामुळे मी सलग ती सुटी घेत गेलो आणि मिरज अन् पनवेल येथे सेवेसाठी गेलो. माझी स्वेच्छानिवृत्ती मंजूर होऊन ‘भविष्य निर्वाह निधी’चा (प्रॉव्हिडंट फंडचा) धनादेश कार्यालयात आल्यावर कार्यालयाने मला मिरजहून बोलावले आणि मी अमरावतीला आल्यावर मला धनादेश दिला.

४ ए ४. स्वेच्छानिवृत्ती घेतांना मुख्य अभियंत्यांनी पूर्ण सहकार्य करणे आणि साधनेविषयी जाणून घेऊन साधनेसाठी प्रोत्साहित करणे : मी ३१.१२.२००० या दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी स्वेच्छानिवृत्ती घेतांना माझ्या मुख्य अभियंत्यांनी मला पूर्ण सहकार्य केले. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून ‘मी कोणती साधना करतो ?’, हे विचारून मला साधनेसाठी प्रोत्साहित केले. मी त्यांना सनातनचे ‘अध्यात्म’, ‘गुरुकृपायोग’, तसेच ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हे ग्रंथ भेट म्हणून दिले. त्यांनी माझी स्वेच्छानिवृत्ती लगेच स्वीकारून मला निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पुष्कळ साहाय्य केले.

४ ए ५. मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून आजपर्यंत आम्हाला कधीही आर्थिक टंचाई जाणवली नाही. मला आर्थिक साहाय्याची आवश्यकता असल्यास देवाच्या कृपेमुळे कुठूनतरी तेवढी रक्कम माझ्या अधिकोषातील खात्यावर जमा होते.

४ ए ६. २८ वर्षांच्या नोकरीत पदोन्नतीसाठी अधिक कालावधी लागणे आणि त्या तुलनेत अध्यात्मातील संतपदापर्यंतचा प्रवास गुरुकृपेने १६ वर्षांत पूर्ण होणे : नोकरी करत असतांना माझी नेमणूक झाली होती, ते पद पर्यवेक्षकाचे होते. त्यानंतरचे पद शाखा अभियंत्याचे होते आणि जर मी पदोन्नतीसाठी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घेतला असता, तर मी ‘उपअभियंता’ या पदापर्यंत पोचू शकलो असतो. स्वेच्छा निवृत्तीच्या वेळी माझी २८ वर्षांची नोकरी झाली होती. या पदावलीची तुलना अध्यात्मातील प्रगतीशी केली, तर ‘मुमुक्षू, जिज्ञासू, साधक, शिष्य आणि संत’, हा प्रवास मी गुरुकृपेने १६ वर्षांत पूर्ण केला.’
(क्रमश:)
– (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०२१)