भारताला तेलाच्या आयातीच्या संदर्भात पाश्‍चात्त्य देशांनी सल्ला देऊ नये ! – भारताने सुनावले

नवी देहली – भारताने पाश्‍चात्त्य देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून खडे बोल सुनावले आहेत. भारताने म्हटले आहे, ‘तेल संपन्न असलेले देश किंवा रशियामधून तेलाची आयात करणारे देश प्रतिबंधात्मक व्यापाराचे समर्थन करू शकत नाहीत. त्यामुळे भारताला तेलाच्या आयातीच्या संदर्भात या देशांनी सल्ला देऊ नये आणि भारताच्या इंधन व्यवहारांचे राजकारण केले जाऊ नये.’ भारत स्वतःच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अधिक अवलंबून आहे. भारताला कच्च्या तेलाच्या आवश्यकतेपैकी जवळपास ८५ टक्के तेलाची आयात करावी लागते.

१. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’ या देशातील प्रमुख तेल आस्थापनाने रशियाकडून ३० लाख  बॅरल (पिंप) कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. यासाठी रशियाने आंतरराष्ट्रीय दरांवर मोठी सवलत देऊ केली होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतरची भारताने व्यापारच्या माध्यमातून केलेली ही पहिलीच खरेदी आहे. रशियाने आतापर्यंत केवळ मार्चमध्ये भारताला प्रतिदिन ३ लाख ६० सहस्र बॅरल तेल निर्यात केले आहे, जे वर्ष २०२१ च्या सरासरीच्या जवळपास चार पट आहे.

. भारतात सर्वाधिक तेलाची आयात पश्‍चिम आशियातील इराकमधून २३ टक्के, सौदी अरेबियातून १८ टक्के, तर संयुक्त अरब अमिरात ११ टक्के एवढी करतो. भारत अमेरिकेकडून ७.३ टक्के तेल आयात करतो.