उष्माघाताच्या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

विधानसभा

मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणेला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘भरपूर पाणी प्या, चहा-कॉफी टाळा’ यांसह लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयांत यासाठी रुग्ण भरती झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत १६ मार्च या दिवशी दिली.

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे

शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी ‘सध्या राज्यातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सर्वसाधारण तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके असून नागपूर येथे ४२ अंश सेल्सिअस तापमान झाले आहे. यापुढील काळात उष्माघात टाळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे ?’, असे औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना आरोग्यमंत्री बोलत होते.