तेजस्वी सातपुते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी !


सातारा, १६ मार्च (वार्ता.) – सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यावर कारवाईची मागणी बार्शीचे (जिल्हा सोलापूर) आमदार राजेंद्र राऊत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली.

आमदार राजेंद्र राऊत पुढे म्हणाले, सातपुते या अवैध उद्योगांना सहाय्य करून प्रचंड हप्ते गोळा करतात. अधिकाराचा अपलाभ उठवत गुन्हेगारांना पाठीशी घालतात. सातारा येथे कार्यरत असतांना त्यांनी एका सामान्य व्यक्तीवर खोटा गुन्हा नोंद केला होता. सातारा येथील एका व्यापार्‍याला मोक्का लागलेला असतांना त्यांनी मोठी तडजोड करून मोक्का काढून टाकल्याचा आरोप सातपुते यांच्यावर आहे. (असे आरोप असलेली व्यक्ती पोलीस विभागात कार्यरत असणे, हे यंत्रणेसाठी धोकादायक आहे. त्यांच्याविषयी पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे, हे जनतेला समजले पाहिजे. – संपादक)

न्यायालयासमवेत सातपुते यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण न्यायालयातही खटले चालू आहेत. सातपुते या महिला असूनही वाईट कामे करत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाची मानहानी होत आहे. अशा अधिकार्‍यांना पोलीस विभागातून काढून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’) आणि सीबीआय यांच्याद्वारे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.