|
भिवंडी (जिल्हा ठाणे) – येथील पी.व्ही.आर्. चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ या काश्मीरमधील हिंदूंच्या अत्याचारांवर आधारित चित्रपटाचा ११ मार्च या दिवशी खेळ चालू असतांना आवाज आरंभीपासूनच नीट ऐकू येत नव्हता. त्याविषयी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे जाऊन अनेकदा तक्रार केली, तरी व्यवस्थापनाने विशेष दाद दिली नाही. अखेरीस प्रेक्षक संतापले आणि सर्वांनी अभूतपूर्व एकजूट दाखवून चित्रपट बंद करून व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी प्रेक्षकांचे म्हणणे ऐकून घेऊन व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर चित्रपट पुन्हा व्यवस्थित आवाजात चालू करण्यात आला. या वेळी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात सभागृहाच्या बाहेर येऊन ‘भारतमाता की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदी घोषणही दिल्या.
पोलिसांशी चर्चा करतांनाही प्रथम पोलिसांनी ‘तुम्हाला पैसे परत हवे आहेत का ?’ असा प्रश्न विचारला. त्यावर प्रेक्षकांनी त्यांना सांगितले, ‘‘पैशांचा प्रश्न नाही. चित्रपट बघायचा आहे.’’ (पोलिसांचा संतापजनक प्रश्न ! मूळ समस्येवर उपाययोजना काढण्याऐवजी प्रेक्षकांनाच धारेवर धरणारे पोलीस हे भारताचे कि पाकचे, असा प्रश्न पडतो ! – संपादक) या संपूर्ण घटनाक्रमाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून ‘व्हायरल’ झाले आहेत.
येथे चित्रपटगृहात अधिक जागा शिल्लक असूनही बाहेर ‘हाऊसफूल’ (जागा भरल्या आहेत) असा फलक लावण्यात आल्याचेही समजते.
याविषयी फेसबूकवर माहिती देणार्या एका प्र्रेक्षकाला प्रतिसाद देतांना ‘सिटी सेंटर’ या अन्य एका चित्रपटगृहातही अशाच प्रकारे घटना घडल्याचे एका प्रेक्षकाने म्हटले आहे.