मरणासन्न काँग्रेस !

काँग्रेसचे अधःपतन, हे हिंदूविरोधी निर्णय घेतल्याने हिंदूंनी तिला दिलेली शिक्षा होय !

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातही पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी, ‘काँग्रेस मरणपंथाला लागलेली पहावत नाही’, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यातून काँग्रेसची विदारक स्थिती आपल्या लक्षात येते. पक्षातील सर्वांना सामावून घेणारे, त्यांना दिशादर्शन करणारे असे नेतृत्वच काँग्रेसकडे शिल्लक नसल्यामुळे काँग्रेस मरणपंथाला लागली आहे. काँग्रेसप्रेमींना प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांच्यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी दिसते’, असे काँग्रेसप्रेमींना वाटत होते. उत्तरप्रदेश निवडणुकीत काँग्रेसची धुरा प्रियांका वाड्रा यांनी सांभाळली होती. असे असूनही राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला.

या लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमधील ‘जी २३’ नेत्यांची, म्हणजेच पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. यात ‘आत्मपरीक्षण’, ‘आत्मचिंतन’ होईल; मात्र त्यामुळे पराभवाची खरोखरच कारणमीमांसा होईल का ? पराभवानंतर काँग्रेसवाल्यांच्या प्रतिक्रियांवरून तरी असे वाटत नाही. काही जण भाजपला दुषणे देत आहेत, तर काही जण ‘इलेक्ट्रॉनिक यंत्रांत मुद्दामहून बिघाड केल्यामुळे पराभव झाला’, असेही सांगत आहेत. अंतर्मुख होऊन पराभवाची कारणमीमांसा करणारे पुष्कळ अल्प आहेत. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली. ती उपभोगण्यासाठी काँग्रेसने अवलंबलेली कुनीती ही भारताच्या मुळावर उठली. एकगठ्ठा मतांसाठी सातत्याने हिंदूंना डावलून मुसलमानांचे लांगूलचालन करणे आणि त्यासाठी जिहादी आतंकवाद्यांचीही पाठराखण करण्याचे दृष्कृत्य काँग्रेसने केले. या पापांची फळे आज काँग्रेस भोगत आहे. हे अधःपतन अचानक झाले नाही. त्याचा आरंभ पुष्कळ आधीपासून झाला होता. त्याचे परिणाम वर्ष २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दिसून आले. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लोकांना हिंदुत्वनिष्ठ आणि कर्तव्यतत्पर शासनकर्ता मिळाल्यानंतर लोकांनी भाजपला बहुमताने निवडून दिले. त्यानंतर काँग्रेसची जी पडझड चालू झाली, ती थांबलेली नाही. वास्तविक ही केवळ काँग्रेसच नव्हे, तर राजकीय हितासाठी हिंदुविरोधी आणि राष्ट्रघातकी निर्णय घेणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना चपराक आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर ‘काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन करण्याची हीच योग्य वेळ आहे’, असे तृणमूल काँग्रेसचे बंगालमधील मंत्री फिरहाद हाकिम यांनी केले. याने काही लाभ होणार नाही; कारण जी काँग्रेसची दुःस्थिती झाली आहे, भविष्यात तशीच स्थिती तृणमूल काँग्रेसचीही होणार आहे. तृणमूल काँग्रेसने बंगालमध्ये सत्ता टिकवण्यासाठी तेथील हिंदूंवर जो अन्याय केला आहे, त्याला गणती नाही. असा पक्ष फार काळ सत्तेत कसा राहील ? काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !