कुटुंबियांसाठी आधार बनलेल्या आणि ईश्वरावर श्रद्धा असणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) !

मूळच्या डिचोली येथील आणि आता सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणार्‍या श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता १६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी एका सत्संगात घोषित करण्यात आली. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्रीमती सुनंदा सामंत

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांनी सामंत कुटुंबियांवर अनुभवलेली गुरुकृपा !

१. सौ. नंदिनी यांच्या वडिलांना कर्करोग होणे आणि त्यांना मुलाची (श्री. अनिल यांची) काळजी वाटणे

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत

वर्ष १९९५ मधील ही घटना आहे. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी यांचे वडील (कै. शरच्चंद्र सामंत) यांना पोटाचा कर्करोग झाला होता. शेवटच्या काही मासांत ते आमच्याकडे सांगली येथे रहायला आले होते. ‘हा रोग बरा होणार नाही आणि हे शेवटचे काही आठवडे राहिले आहेत’, हे आम्हाला आणि त्यांना पूर्ण कळून चुकले होते. या काळात ते पुष्कळ काळजीत दिसत असत. त्या वेळी मी एकदा त्यांच्यासोबत बोललो. ‘त्यांची काही इच्छा आहे का ?’, ‘त्यांना कशाची काळजी वाटते ?’, असे मी त्यांना विचारले. ते म्हणाले, ‘‘श्री. अनिल (सौ. नंदिनीचा भाऊ त्या वेळी औषधशास्त्र शिकत असे.) याची काळजी वाटते. त्याचे पुढे कसे होणार ?’’

२. मुलाची काळजी न करण्याविषयी सांगणे आणि त्या वेळी प.पू. भक्तराज महाराजांचे स्मरण करून ‘तुम्हीच काय ते पहा’, अशी प्रार्थना करणे

मी त्यांना पटकन बोलून गेलो, ‘‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही लक्ष देऊ. काहीतरी चांगले होईल.’’ त्या वेळी मला ‘त्याचा (श्री. अनिल सामंत यांचा) नामजप किंवा साधना चालू होईल. आपणही त्याचे काही तरी बघू आणि त्याचे भले होईल’, असे अभिप्रेत होते. मग मी प.पू. भक्तराज महाराजांचे स्मरण केले आणि मनात म्हटले, ‘तुम्हीच काय ते पहा !’ कालावकाशाने सौ. नंदिनी यांच्या वडिलांचे निधन झाले. माझ्या मनात मी हे जे काही बोललेलो होतो, ते तसेच राहिले होते.

३. श्री. अनिल यांना व्यावहारिक समस्या येत रहाणे आणि त्यावर मार्ग काढता न आल्याची मनात सल रहाणे

त्यानंतर २ वर्षांनी वाटले, ‘जर श्री. अनिल यांना व्यवहारिक अडचणी आल्या, त्यांना नोकरी मिळाली नाही, तर काही वर्षांनी आपण आपले स्वतंत्र चिकित्सालय अथवा रुग्णालय उभारू. (त्या काळात मी आणि सौ. नंदिनी दुसर्‍याच्या मालकीच्या रुग्णालयात काम करत होतो.) त्या वेळी तेथे जवळ औषधाचे दुकान काढून ते श्री. अनिल यांना चालवायला देऊ.’ प्रत्यक्षात सर्व वेगळे घडले. आम्ही वर्ष १९९८ पासून पूर्णवेळ साधना करू लागलो आणि गोव्यात आलो. पुढे श्री. अनिल यांचा विवाहही झाला. श्री. अनिल यांना समस्या येत राहिल्या. अर्थात् मला कुणी ‘त्यातून मार्ग काढा’, असे सांगितले नाही. मनात कुठेतरी यासंदर्भातील सल राहून गेली होती.

आधुनिक वैद्य (सौ.) नंदिनी सामंत

४. सौ. नंदिनी यांच्या माहेरी असलेल्या अडचणींविषयी परात्पर गुरुदेवांना सांगणे, त्यावर ते काहीही न बोलणे आणि त्यानंतर ‘सर्व देवाची इच्छा आणि तटस्थ राहून पहाणे’, ही आपली साधना आहे’, अशा भूमिकेत रहाणे

अनुमाने वर्ष २००८ मध्ये काही कारणाने मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे सौ. नंदिनीच्या साधनेच्या संदर्भात माझी व्यथा व्यक्त करतांना बोलून गेलो की, ‘तिने आपल्या घराचा, तिच्या आईचा आणि श्री. अनिल यांचा विचार करायला हवा. त्यांना कसा आधार देऊ ? हे पहायला हवे.’ त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी विचारले, ‘‘काय समस्या आहे ?’’ त्यावर मी त्यांना सौ. नंदिनी यांच्या माहेरची आर्थिक स्थिती आणि श्री. अनिल यांची समस्या यांविषयी सांगितले. त्या वेळी ते त्यावर काही बोलले नाहीत. विषय तेथे संपला. मी त्यांना वर वर्णिलेला प्रसंग सांगितला नाही. अशीच वर्षे निघून गेली. कधीतरी सौ. नंदिनीने काही सांगितले, तर जेवढे शक्य आहे तेवढे आम्ही करत राहिलो. ‘मी सर्व देवाची इच्छा आणि तटस्थ राहून पहाणे’, ही आपली साधना अशा भूमिकेत राहिलो.

५. श्री. अनिल यांना गंभीर आजार होणे आणि त्यातून बरे झाल्यावर टप्प्याटप्प्याने पूर्ण सामंत कुटुंबीय आश्रमात वास्तव्यास येणे

वर्ष २०१८ मध्ये श्री. अनिल यांना गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती करावे लागले. त्याच काळात मी माझ्या आईला एका गंभीर समस्येमुळे पुणे येथे घेऊन गेल्याने मी श्री. अनिल यांच्या आजारपणात काही करू शकत नव्हतो. रुग्णालयात भरती झाल्यानंतर काही दिवसांत श्री. अनिल यांची स्थिती थोडी सुधारली. पुढे श्री. अनिल यांना आश्रमात येण्यास सांगितले. ते येथे आल्यानंतर सेवा करू लागले. त्यांची स्थिती हळूहळू सुधारत गेली. कालावकाशाने माझ्या सासूबाई श्रीमती सुनंदा सामंत आणि श्री. अनिल यांची पत्नी सौ. अदिती यांनाही आश्रमात येऊन रहाण्याची अनुमती मिळाली. आता श्री. अनिल आणि सौ. अदिती आश्रमसेवांमध्ये रुळले आहेत.

६. ‘श्रीगुरूंनी एका साधकाला जरी आपले म्हटले, तरी ते त्याच्या सर्व कुटुंबावर गुरुकृपेचे छत्र धरतात’, हे शिकायला मिळणे

यातून मला शिकायला मिळाले की, साधकाने नि:स्वार्थपणे, सद्हेतूने श्रीगुरूंचे स्मरण करून कुणाला शब्द दिला, तर श्रीगुरु तो खाली पडू देत नाहीत. तसेच श्रीगुरूंनी एका साधकाला जरी आपले म्हटले, तरी ते त्याच्या सर्व कुटुंबावर गुरुकृपेचे छत्र धरतात.’

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधकाकडून सहज वदलेले वाक्य गुरूंनी सत्यात उतरवणे ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ‘नंदिनीताईंच्या वडिलांशी बोलतांना दुर्गेशदादांच्या तोंडून सहजतेने निघालेले शब्द देवानेच, म्हणजेच गुरूंनीच वदवून घेतले आणि त्यांनीच ते सत्यात उतरवले. दुर्गेशदादांच्या सासर्‍यांनी त्यांना वाटणारी काळजी त्यांच्याकडे व्यक्त केली, तेव्हा बुद्धीतून कोणताही विचार न करता त्यांच्याकडून नकळत आधार देणारे शब्द सहज बोलले गेले. त्यामुळे दुर्गेशदादांच्या सासर्‍यांना श्रीगुरूंनी अप्रत्यक्षरित्या आश्वस्तच केले.

दुर्गेशदादा आणि सौ. नंदिनीताई यांनी समष्टीचे दायित्व घेत झोकून देऊन सेवा केली. मग देव त्यांचे अन् त्यांच्या परिवाराचे दायित्व नाही का घेणार ? संपूर्ण कुटुंबाकडून गुरूंनी साधना करवून घेतली आणि त्यांच्या साधनेला हातभार लावला. दुर्गेशदादा आणि सौ. नंदिनीताई हे प्रसारसेवेत असतांना श्रीमती सामंतआजींनी श्री. मुकुलला लहानपणापासून सांभाळले. या माध्यमातूनही सामंत कुटुंबियांनी साधनेसाठी केलेला त्याग, तसेच सनातन संस्थेच्या कार्यात त्यांनी केलेले योगदानही पुष्कळ मोठे आहे. आता सामंत परिवाराच्या उद्धारासाठी त्या सर्वांना प.पू. डॉक्टरांनी भूलोकातील वैकुंठात (रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात) आणले आहे. सामंत कुटुंबियांच्या या अनुभवातून ‘गुरु आपल्याकडून साधना कशी करवून घेतात, हे आपल्या लक्षात येते. हे सर्व आपल्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. त्यामुळे आपण आपल्या अल्पबुद्धीने ते जाणू शकत नाही’, हेच लक्षात येते.’

श्रीमती सामंतआजींविषयी कुटुंबीय आणि अन्य साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. अनिल सामंत (मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. अनिल सामंत

१. मुलांवर सुसंस्कार करणे : ‘आईने आम्हा दोघांवर (मी आणि सौ. नंदिनीताई यांच्यावर) चांगले संस्कार केले. तिने नेहमी आमच्यावर ‘कुणाला प्रत्युत्तर न देणे, इतरांना साहाय्य करणे, आहे त्यात समाधानी रहाणे, अपेक्षा न करणे’, असे अनेक सुसंस्कार जाणीवपूर्वक केले.

२. आदर्श शिक्षिका : आई शाळेत शिक्षिका होती. आईच्या शाळेतील शिक्षक, तसेच विद्यार्थी आईविषयी नेहमी कौतुकाने बोलायचे.

३. ती २५ हून अधिक वर्षांपासून सकाळी अंघोळीनंतर नियमितपणे धार्मिक पोथ्यांचे वाचन करते. तेव्हा ती त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झालेली असते.

४. समाधानी वृत्ती : आई प्रत्येक परिस्थितीत शांत असते. ती तिच्याकडे जे आहे, त्यात समाधानी असते. ती कधीच कोणाकडून अपेक्षा करत नाही.

५. इतरांना सातत्याने साहाय्य करणे : आई नेहमी इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असते. तेव्हा ती भेदभाव करत नाही. त्या वेळी तिची समोरच्या व्यक्तीकडून कसलीही अपेक्षा नसते.

६. आधार देणे : आमचे स्वतःचे घर बांधायचे काम चालू असतांना बाबांनी अधिकोषात ऋण मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या वेळी त्यांचे सर्व सुस्थितीत असूनही बाबा ज्या २ व्यक्तींसाठी जामीन राहिले होते, त्यांनी त्यांच्या ऋणाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे बाबांना ऋण मिळाले नाही. त्या वेळी आईने डगमगून न जाता मैत्रिणीच्या साहाय्याने आरंभी आवश्यक ती रक्कम जमा केली.

७. ईश्वराप्रती श्रद्धा : आईच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; मात्र आईची ईश्वराप्रतीची श्रद्धा कधीच ढळली नाही. त्यामुळेच आई नेहमी शांत राहू शकते.’

सौ. अदिती अनिल सामंत (सून)

सौ. अदिती अनिल सामंत

१. श्रीमती सामंतआजींनी मला विविध गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन दिले ! : ‘माझा विवाह झाल्यानंतर मला शिक्षिका म्हणून चाकरी करायची होती. विवाहापूर्वी मी पुणे येथे शिक्षण घेत असतांना एक दिवस आईंनी (श्रीमती सुनंदा सामंत यांनी) त्या ज्या शाळेत चाकरी करायच्या, तेथे शिक्षिका म्हणून एक जागा उपलब्ध असल्याचे दूरभाषद्वारे सांगितले. पुढे मला तेथे नोकरी मिळाली. यानंतर मला शिवणकला, ज्वेलरी यांच्याविषयी शिकायचे होते. ते शिकण्यासही त्यांनी प्रोत्साहन दिले आणि त्यासाठी लागणारे साहित्यही त्यांनी मला घरी आणून दिले.

२. प्रेमभावाने माणसे जोडणार्‍या श्रीमती सुनंदा सामंत ! : आईंना प्रेमभावाने माणसे जोडायला आवडते. घरी असतांना कुणी पाहुणे, नातेवाईक आले, तर त्यांच्याशी बोलणे, त्यांना खाऊ देणे, त्यांचे चहा-पाणी करणे आदी गोष्टी त्या प्रेमाने करायच्या.

३. नित्यनेमाने साधना करणार्‍या श्रीमती सुनंदा सामंत ! : आई सकाळी लवकर उठून घरातील स्वयंपाक आदी सर्व कामे दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण करायच्या. त्यानंतर त्या ग्रंथाचे वाचन करायच्या. ते झाल्यानंतर मगच दुपारचे जेवण ग्रहण करायच्या. यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा ग्रंथ वाचन, उपासना करायच्या. असा त्यांचा साधनेचा नित्यक्रम आजही चालू आहे.

आईंच्या एकूणच प्रीतीमय वागण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याप्रती आणि भगवंताप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

सौ. मीनल राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी

‘श्रीमती सामंतआजी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर प्रारंभी त्या अलिप्त रहात असत. ‘सर्व साधक सेवेत असल्याने त्यांच्याशी कसे बोलायचे ?’, असे त्यांना वाटत असे. त्या हळूहळू सर्व साधकांशी मनमोकळेपणाने बोलू लागल्या. त्यांना कागदांचे वर्गीकरण करण्याची दिलेली सेवा सहजतेने, तत्परतेने आणि साधकांना पाहिजे तशी त्या करून द्यायच्या. त्यांच्याकडे बघून ‘त्या शिक्षिका होत्या’, असे कधी जाणवले नाही. त्या येणार्‍या-जाणार्‍या साधकांची आपुलकीने चौकशी करतात. त्या ये-जा करतांना त्यांना संगणकाच्या पडद्यावर (स्क्रीनवर) परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र दिसल्यावर त्याच ठिकाणी थांबून त्या आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतात.

या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘व्यवहारात शिक्षक म्हणजे शिकवणारा, म्हणजेच तो सतत शिकवण्याच्या भूमिकेत असतो; परंतु श्रीमती सामंतआजी यांच्याकडे बघून त्या शिक्षिका वाटत नाहीत; कारण त्या शिकवण्याच्या भूमिकेत नसून सतत शिकण्याच्या स्थितीत (शिष्यभावात) असतात. त्यामुळेच त्या साधकांकडून सतत शिकत असतात आणि सर्वांशी मिळून मिसळून रहातात. त्यांच्यातील प्रेमभावामुळे साधकांना त्या आपल्यातीलच वाटतात.’’

सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी

‘श्रीमती सामंतआजी या नियमितपणे ग्रंथांचे वाचन करत असतात. त्या आश्रमात येणार्‍या-जाणार्‍या साधकांची आवर्जून चौकशी करतात. काही दिवसांपूर्वी मी त्यांना सायंकाळचा चहा देण्यास विसरले होते. त्यामुळे मी त्यांची क्षमायाचना करण्यासाठी गेले. त्या वेळी त्या ‘एक वेळ चहा दिला नाही, तर एवढे काही नाही, असू दे’, असे म्हणाल्या. ‘या प्रसंगात आजींना कशाचीही आसक्ती राहिलेली नाही’, याची मला जाणीव झाली.’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक