युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे ! – पोप

व्हॅटिकन सिटी – युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे. तेथे रक्त आणि अश्रू यांच्या नद्या वहात आहेत. हे युद्धच असून त्यात मृत्यू आणि विध्वंस होत आहे, असे प्रतिपादन ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे केले. व्हॅटिकन सिटी येथील सेंट पीटर्स चौकातील साप्ताहिक मेळाव्यात उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी सर्वांना शांततेचे, तसेच नागरिकांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. रशियाने युक्रेनवरील कारवाईला ‘विशेष सैनिकी मोहीम’ म्हटले आहे; परंतु पोप यांनी मात्र हे युद्धच असल्याचे सांगितले.

रशिया स्वतःच्या भूमिकेवर ठाम

रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवण्यात येईल, असा पुनरूच्चार रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला.  पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली.

१५ लाख लोकांनी देश सोडला

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत अनुमाने १५ लाखांहून अधिक युक्रेनियन नागरिकांनी देश सोडला आहे. या सर्वांनी युक्रेनच्या शेजारी असलेल्या विविध देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यामुळे दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच युरोपवर निर्वासितांचे संकट तीव्र होत असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांनी ६ मार्च या दिवशी नोंदवले.

११ सहस्र सैनिक मारल्याचा युक्रेनचा दावा

रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून आतापर्यंत ११ सहस्रांहून अधिक रशियन सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण दलाने केला आहे. रशियाचे सैन्य आता काळ्या समुद्रातील ओडेसा बंदर शहरावर बाँबफेक करण्याच्या सिद्धतेत असल्याची भीती युक्रेनने व्यक्त केली आहे.

रशियातील आंदोलक कह्यात

युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ६ मार्चला रशियाच्या नागरिकांना युक्रेनवरील आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाच्या निषेधार्थ निदर्शने करणार्‍या एक सहस्रांहून अधिक रशियन नागरिकांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.